शिंदखेडला आल्यानंतर अनेक गोष्टी समजल्या, माझे सहकारी संदीप बेडसे आणि बाकीच्या सहकाऱ्यांनीही काही बाबी माझ्या कानावर घातल्या. हा तालुका कष्टकरी शेतकऱ्यांचा तालुका आहे. पण दिसत काय? इथं गुंडगिरी सुरू झाली. सत्तेचा गैरवापर सुरू झाला. खोटे खटले निरपराध लोकांवर भरायचे आणि दमदाटी करून गुंडगिरीचं राज्य आणू शकतो असं चित्र काही लोकांनी उभं केलं आहे. दुर्दैवाने त्यांना २०-२० वर्ष आमदारकी दिली ती आमदारकी इथल्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी न वापरता ती लोकांवर खटले भर, त्यांना तुरुंगात टाक, त्यांना त्रास दे, सत्तेचा गैरवापर कर म्हणून वापरली जात आहे. असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. ते शिंदखेडा, धुळे येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
हेमंत देशमुखांसारखा माझा एक सहकारी, एक प्रामाणिक माजी मंत्री की जो तुम्हा लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी पडेल ते कष्ट करतो त्यांच्यावर खोटे खटले भरले. जे तुमच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात त्या हेमंत देशमुखांना अटक केली जाते, तुरुंगात टाकला जातं याचा अर्थ सत्तेचा गैरवापर कसा केला जातो याचा एक चमत्कारिक उदाहरण या तालुकामध्ये बघायला मिळतं. सत्ता लोकांच्या सेवेसाठी असते पण काही लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा माज डोक्यात शिरतो आणि एकदा सत्तेचा माज माणसाला आला की तो अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करतो. आपण लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीत जो अधिकार दिला तो लोकांची सेवा करण्याचा असंही ते यावेळी म्हणाले.
राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देऊ; शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
एका बाजूने लोकांची सेवा करणारे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्माद आहे. ज्यांना हा उन्माद चढलेला आहे त्यांना खड्यासारखं बाहेर काढायचं. त्यांना त्यांची जागा दाखवायची हे काम या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला करायचं आहे असा थेट इशाराच पवारांनी यावेळी दिला आहे. २०-२० वर्षे आमदारकी पण काही विकास नाही. रस्ते धड नाहीत. शेतीची अवस्था ठीक नाही. मग काय केलं काय ह्या २० वीस वर्षांमध्ये? काही कारखाने काढले? साखर कारखाने काढले? जी कारखानदारी होती तीही बंद केली. नव्या पिढीला एमआयडीसीमधून रोजगार दिला? काय केलं मग? आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रगती दिसते, नाशिकमध्ये वेगळं चित्र दिसतं. असं का? कारण गेली २० वर्ष या तालुक्यामध्ये विकासाच्या संदर्भात पावलं टाकली गेली नाहीत असं निरीक्षणही पवारांनी यावेळी नोंदवल.