काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. उद्योगस्नेही वातावरण देण्यात सरकारला अपयश आलं आहे. ज्या पापातून शिंदे, फडणवीस पवार सरकार निर्माण झालं. त्यासाठी जो खोक्यांचा वापर झाला. त्या वातावरणामुळे उद्योग विभागात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळे कोणताही मोठा उद्योगपती महाराष्ट्रात येत नाही, असा आरोप त्यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील वाढती बेरोजगारी आणि दुसऱ्या राज्यात जात असलेल्या प्रकल्पांबाबत चिंता व्यक्त केली.
हायटेक इंडस्ट्री उदाहरणच द्यायचं झालं तर सेमी कंडक्टर फॅब्रीकेशनचे काही युनिट भारतात येणार आहेत. केंद्र सरकारने दहा अब्ज डॉलर अनुदान देण्याचंही जाहीर केलं आहे. परंतु, या योजनेत आतापर्यंत सेमीकंडक्टर असेंब्ली टेस्टिंग युनिट, फॅब युनिट, चीप असेंब्ली असे तीन यु्निट गुजरातला स्थापन होणार आहेत तर एक आसाममध्ये होणार आहे. हे युनिट मुंबईतल्या टाटा इलेक्ट्रिक सारख्या कंपन्या स्थापन करणार आहेत. पुण्यामध्ये सध्या हिंजेवाडीमध्ये येणाऱ्या 37 कंपन्या बाहेरच्या राज्यांत गेल्या आहेत. कारण त्यांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे.
आज मुंबईत जगातले सर्वाधिक अब्जाधीश राहतात. त्यांची संख्या जगातील अन्य कोणत्याही शहरापेक्षा जास्त आहे. तरी देखील श्रीमंत अतिश्रीमंत उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक का करत नाहीत? 2017 मध्ये फडणवीसांनी घोषणा केली होती की मोठे युनिट पुण्यात येणार आहे. 50 हजार लोकांना रोजगार मिळेल. पण पुढे हे युनिट तामिळनाडूत गेले. काही दिवसांपूर्वी टाटा इलेक्ट्रिकने अॅपल फोन उत्पादन युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पण तेही युनिट तामिळनाडूतल्या होसूर येथे येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तेथे 55 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
भारतात अॅपलचे चार सब काँट्र्रॅक्टर आहेत. जे अॅपलचा फोन तयार करतात. त्यातले दोन युनिट तामिळनाडूत आहेत. एक कर्नाटकात आणि एक हैदराबादेत आहे. महाराष्ट्रात एकही युनिट नाही. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घोषणा केली होती की 2023 मध्ये आयफोन तयार करण्याचे युनिट महाराष्ट्रात येईल. आयफोनची एकही फॅक्टरी महाराष्ट्रात आलेली नाही. याला कोण जबाबदार आहे? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
Prithviraj Chavan उद्योग विभागात भ्रष्टाचार बोकाळला
महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण आहे. राज्यातल्या उद्योग खात्यात जो भ्रष्टाचार आहे त्यामुळे कोणतेही मोठे उद्योगपती महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. त्यामुळे राज्यात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सेमी कंडक्टरची गुंतवणूक आपल्याकडे झाली पाहिजे पण मोदी सगळे प्रकल्प गुजरातला घेऊन जात आहेत. टाटा हे महाराष्ट्रातले उद्योजक आहेत पण त्यांनी आसाममध्ये युनिट नेण्याचा निर्णय घेतला. नागपूर, जालना, अमरावती, लातूर, सिंधुदुर्ग या कोणत्याही ठिकाणाचा विचार त्यांनी केला नाही. राज्यातल्या युवकांनी याचा विचार करावा. राज्य सरकारचं हे जे अपयश आहे त्याबद्दल सरकारला जाब विचारावा.
Prithviraj Chavan महाराष्ट्राचे प्रकल्प मोदींकडून हायजॅक
वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट तळेगावात येणार होता. तिथले लोकं आले होते. मला स्वतः या गोष्टीची माहिती आहे. त्यांनी पुण्यातील जागा पाहिली. पुण्यात किती शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स आहेत किती क्लब आहेत किती फाइव्ह स्टार हॉटेल्स आहेत याची माहिती घेतली. त्याचवेळी हा प्रकल्प नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) गुजरातला हायजॅक केला. पण गुजरातला तसं वातावरण नाही त्यामुळे हा प्रकल्प बारगळला असून देशातून निघून गेला आहे याला कोण जबाबदार आहे?
उद्योगस्नेही वातावरण देण्यात सरकारला अपयश आलं आहे. ज्या पापातून शिंदे, फडणवीस पवार सरकार निर्माण झालं. त्यासाठी जो खोक्यांचा वापर झाला. त्या वातावरणामुळे उद्योग विभागात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळे कोणताही मोठा उद्योगपती महाराष्ट्रात येत नाही आणि आमच्या पोरांना रोजगार मिळत नाही अशी खंत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.