राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यंदा निवडणूक लढणार का? असा प्रश्न बहुदा पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे अजित पवार यांची अलीकडील काही वक्तव्ये. चार दिवसांपूर्वी बारामतीमधील (Baramati) एका कार्यक्रमात अजित पवार यांनी बारामतीकरांना आता दुसरा आमदार पाहिजे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यंदा निवडणूक लढणार नाहीत असा अर्थ काढला गेला. त्यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या नेत्याने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार बारामतीत निवडणूक लढवायला घाबरतात अशी प्रतिक्रिया माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिली.
पाटील पुढे म्हणाले, बारामतीकर जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता अजित पवार स्वतःच सांगत आहेत की मी बारामतीमधून निवडणूक लढणार नाही. बारामतीत शरद पवार यांची कामगिरी आहे. त्यामुळेच अजितदादा बारामती मतदारसंघातून निवडणूक लढण्यास घाबरत आहेत. फुटून आलेले आमदार आता दोन हजार कोटी तीन हजार कोटींची कामे केल्याचे सांगतात. पण आता लोक जाब विचारू लागले आहेत.
दुष्काळ-अतिवृष्टी झळा! भारतात ७.२ टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या
Ajit Pawar काय म्हणाले होते अजित पवार ?
मी आता 65 वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. आपण लाखांच्या मतांनी निवडून येणारी माणसं आहोत. यावेळी जमलेल्या लोकांनी एकच वादा अजितदादा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी मात्र अजितदादांनी घोषणा देणाऱ्यांना मध्येच थांबवलं आणि मनातली खंत व्यक्त केली. जेथे पिकतं तिथे विकत नाही. मी सोडून दुसरा एखादा आमदार बारामतीकरांना मिळाला पाहिजे. म्हणजे त्या आमदाराची आणि माझ्या कारकिर्दिची तुलना तुम्ही करा.
कार्यकर्त्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, पद असेल तरच काम करील. नाही तर करणार नाही अशी भूमिका आजिबात घेऊ नका. काही चुकत असेल तर जरूर मला सांगा. गावांतील ज्येष्ठ मंडळींना भेटा. त्यांचा आदर करा. संपूर्ण राज्यात मागील पाच वर्षात इतकी कामं झाली नसतील तितकी कामं एकट्या बारामतीत झाली, असे अजित पवार बारामतीमधील एका सभेत म्हणाले होते.