काँग्रेसमध्ये नुकत्याच सामील झालेल्या कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) विरुद्ध भाजप कुणाला तिकीट देणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. भारतीय जनता पार्टीने (Haryana Elections) आपल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत जुलाना मतदारसंघातून कुणाला तिकीट देणार याची घोषणा केली आहे. विनेश फोगाट विरुद्ध भाजपने कॅप्टन योगेश कुमार बैरागी यांना (Yogesh Kumar Bairagi) मैदानात उतरवले आहे. योगेश कुमार बैरागी भाजपच्या युवा नेत्यांमध्ये गणले जातात. राजकारणात पदार्पण करण्याआधी बैरागी एअर इंडियामध्ये नोकरी करत होते. बैरागी सध्या हरियाणा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
भाजपने बैरागी यांना तिकीट देऊन पुन्हा एकदा गैर जाट कार्ड खेळले आहे. योगेश बैरागी ओबीसी प्रवर्गातून येतात. जुलाना विधानसभा मतदारसंघ जाट बहुल आहे. त्यामुळे आता येथे भाजपचे गैर जाट कार्ड किती प्रभावी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. योगेश कुमार बैरागी सध्या फक्त 35 वर्षांचे आहेत. चेन्नईमधील महापूर तसेच कोरोना संकटाच्या काळात विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना पुन्हा मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मिशन राबवले होते. या अभियानात योगेश बैरागी यांनी काम करून पक्षात आपली वेगळी ओळख बनवली होती. योगेश कुमार बैरागी जींद जिल्ह्यातील सफीदो येथील रहिवासी आहेत. त्यांना भाजपने जुलाना मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.
…ही मोदींसाठी लाजिरवाणी गोष्ट, ठाकरे गटाचा घणाघात
काँग्रेस आणि भाजप यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटने काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यानंतर काँग्रेसने विनेशला जुलाना मतदारसंघातून तिकीट दिले. आता या मतदारसंघात भाजप कुणाला तिकीट देणार याची उत्सुकता होती. भाजपने येथे योगेश बैरागी यांना तिकीट दिलं आहे.
Haryana Elections आपचीही यादी जाहीर
हरियाणात आम आदमी पार्टी काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. सोमवारी सकाळी ‘आप’ने काँग्रेसला सांगितले होते की, काँग्रेसने संध्याकाळपर्यंत युतीडीबाबत निर्णय घेतला नाही तर आम्ही आमची यादी जाहीर करू. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून आघाडीबाबत कोणतेही संकेत न मिळाल्याने आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केल्याचे स्पष्ट झालं. ‘आप’ने 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केले.
‘आप’ने नारायणगढमधून गुरपाल सिंग, कलायतमधून अनुराग ढांढा, पुंडरीमधून नरेंद्र शर्मा, घरौंदामधून जयपाल शर्मा, असंधमधून अमनदीप जुंडला, समलखामधून बिट्टू पहेलवान, उचाना कलांमधून पवन फौजी, डबवालीतून कुलदीप गडराना, रनियामधून हॅपी रनिया, भविनामदून इंदू शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली. तर मेहममधून विकास नेहरा आणि रोहतकमधून विजेंदर हुडा यांना मैदानात उतरवले आहे.