एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर घणाघाती (Uddhav Thackeray) टीका केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून रामदास कदम उद्धव ठाकरेंवर तिखट शब्दांत हल्लाबोल करत आहेत. आताही एका मुलाखतीत त्यांनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केले. बाळासाहेब ठाकरे मला मुख्यमंत्री करतील अशी भीती उद्धव ठाकरेंना होती. म्हणून त्यांनी मला मुद्दाम गुहागर येथून उभं केलं. मी दापोली मतदारसंघ मागितला होता. मात्र काही नेत्यांना सांगून, राजकारण करून उद्धव ठाकरेंनी मला पाडलं, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी माझ्यासहीत नारायण राणे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून कारवाया केल्या. उद्धव ठाकरेंच्या या राक्षसी महत्वाकांक्षेपायीच आज शिवसेना फुटली आहे, असा आरोप रामदास कदम यांनी केला. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मला देण्यात आली होती. परंतु, मी विरोधी पक्षनेता व्हावं असे उद्धव ठाकरेंच्या मनातच नव्हतं. त्यामुळेच त्यांनी मला शेवटपर्यंत पत्र न देण्याची भूमिका घेतली. गजानन किर्तीकर स्वतः या गोष्टीला साक्षीदार आहेत. मनोहर जोशी सुद्धा त्यावेळी तिथेच उपस्थित होते.
शिंदेंना हव्यात 120 जागा, भाजप काय निर्णय घेणार?
या प्रकरणात नंतर बाळासाहेबांनीच हस्तक्षेप केला. त्यांनी सांगितल्यानंतरच मला नियुक्तीचं पत्र दिलं गेलं. मला जे काही दिलं ते बाळासाहेबांनीच दिलं. पण उद्धव ठाकरेंचं धोरण म्हणजे एखादं खातं द्यायचं आणि बाजूला बसवायचं असं होतं.