केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून (रविवार) दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र दुर्बळ करण्याचे अमित शहा यांचे स्वप्न असल्याने ते महाराष्ट्रात येतात, असा आरोप त्यांनी केला. (Sanjay Raut’s criticism of Amit Shah’s visit to Mumbai)
केंद्रीय मंत्री अमित शहा दरवर्षी लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतात. त्यानुसार उद्या, सोमवारी ते राजाचे दर्शन घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. खासदार संजय राऊत यांनी आज, रविवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना अमित शहा यांच्या या दौऱ्यावर टीका केली. दळभद्री राजकारण करून महाराष्ट्र कमजोर करण्याचा अमित शहा यांनी केला. मुंबईसह महाराष्ट्रातून व्यापार, उद्योग, रोजगार तसेच महत्त्वाची आर्थिक केंद्रे गुजरातला नेण्याचा प्रयत्न त्यांच्यासह भाजपाकडून केला जात आहे. म्हणूनच अमित शहा यांच्याबाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा; गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
अमित शहा हे एक कमजोर गृहमंत्री आहेत. महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. शिवाय, जम्मू-काश्मीर आणि मणिपूर यासह अन्य राज्ये आहेत. पण, गृहमंत्री अमित शहा यांचे देशातील कायदा सुव्यवस्थेकडे अजिबात लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी आणि लुटमार याला त्यांनी पाठिंबा दिला. मुंबई लुटणे आणि ती लुटणाऱ्याला पाठिंबा देण्याचे कामही त्यांनीच केले, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असे स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अधिक कमजोर करण्याचे काम त्यांनी केले. वस्तुत: ही त्यांची कामे नाहीत. पण महाराष्ट्र दुर्बळ करायचा हे त्यांचे स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते मुंबईत येत असतात, पण महाराष्ट्राची जनता त्यांना शत्रू मानते, असे त्यांनी सुनावले आहे.