आज मोबाइल अन् स्मार्टफोनच्या जमान्यात प्रत्येकाचाच स्क्रीन टाइम (Screen Time) वाढला आहे. मोबाइल असो की टीव्ही तासनतास कसे निघून जातात कळतही नाही. यात मोठी माणसेच आघाडीवर आहेत असं नाही तर अगदी बच्चे कंपनीही आहे. लहान मुलांना तर मोबाइल (Smartphone) अन् टीव्हीचं व्यसनच लागलं आहे. मुले त्रास देऊ नयेत म्हणून आई वडीलही मुलांना मोबाइल देतात. या गोष्टीने मुलांच्या डोळ्यांवर आणि एकूणच आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम होत आहे. ही गोष्ट आपल्याकडे अजूनही गांभीर्याने घेतली जात नाही. मात्र युरोपातील छोट्या देशाने यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
स्वीडन सरकारने 18 वर्षांपर्यंतच्या (Sweden) मुलांसाठी स्क्रीन पाहण्यासंबंधीच्या काही नवीन नियम तयार केले आहेत. मुलांच्या पालकांना स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की लहान मुलांना मोबाइल, टीव्ही पाहू देऊ नका. दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना तर डिजिटल मिडिया आणि टेलिव्हीजनपासून पूर्णपणे दूर ठेवायला हवे, अशा सूचना स्वीडन सरकारच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत. नव्या शिफारशीत म्हटले आहे की दोन ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचा दिवसातील स्क्रीन टाइम एक तासापर्यंतच असावा. 6 ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांचा स्क्रीन टाइम एक ते दोन तासांपेक्षा जास्त नसवा. आरोग्य मंत्री जेकब फोर्समेड यांनी सांगितले की जास्त वेळ मोबाइल किंवा टीव्ही पाहिल्याने मुलांचा स्क्रीन टाइम वाढतो त्यामुळे मुलांना पुरेशी झोपही मिळत नाही.
Smartphone 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचा स्क्रीन टाइम किती असावा
आरोग्य विभागाने स्पष्टपणे म्हटले आहे की 13 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांनीही कमीत कमी स्क्रीन टाइम राहिल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या मुलांचा दिवसातील स्क्रीन टाइम दोन ते तीस इतकाच मर्यादीत असला पाहिजे. झोपायच्या आधी मुलांना मोबाइल, टॅबलेट आजिबात देऊ नये, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
जास्त वेळ स्मार्टफोन, टीव्ही पाहिला जात असल्याने या गोष्टींचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. स्वीडनमधील 13 ते 16 या वयोगटातील मुले शाळेच्या वेळेचा अपवाद वगळत दिवसभरात साडेसहा तास मोबाइल, टीव्ही पाहतात. साडेसहा तासांचा त्यांचा स्क्रीन टाइम आहे. यामुळे शारीरीक हालचाली कमी झाल्या आहेत. मुलांची झोप व्यवस्थित होत नाही. झोपेसाठी आवश्यक वेळ मिळत नाही, असे आरोग्यमंत्री फोर्समेड यांनी सांगितले.
देशातील 15 वर्षे वयोगटातील निम्म्यापेक्षा जास्त मुलांना अपूर्ण झोपेची समस्या आहे. त्यांनी पुरेशी झोप मिळत नाही. स्मार्टफोन आणि टीव्ही पाहण्याचे प्रमाण जास्त असल्याने झोपेचे गणित बिघडण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.