मुंबईच्या लोअर परळ परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहामध्येच ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Mumbai Fire) कमला मिल परिसरातील ‘टाईम्स टॉव्हरम’ध्ये ही आग लागली आहे. अग्निशमन दलासोबत इतर सर्व यंत्रणा माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Mumbai Fire आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट
नेमकी कशामुळे आग लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बीएमसीच्या मुंबई अग्निशमन विभागाने आग लागल्याची माहिती सर्वप्रथम दिली होती. आग ‘लेवल-1’ म्हणून घोषित करण्यात आली होती. मात्र, काही मिनिटांतच ती ‘लेवल-2’ पर्यंत वाढल्याचं जाहीर करण्यात आलं. आगीचा भडका इतका मोठा होता की, संपूर्ण इमारत आगीच्या लपेटात आल्याने धुराचे लोट आकाशात झेपावले होते.
Mumbai Fire अग्निशमन दलाचा त्वरित प्रतिसाद
आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी घटनास्थळी धावत गेले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आत्तापर्यंत कोणतीही गंभीर जखम किंवा जीवितहानी झाल्याचं समोर आलेलं नाही. आगीमुळे इमारतीचं मोठं नुकसान झालं असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Mumbai Fire इमारतीचा विद्युत पुरवठा तातडीने खंडित
अग्निशमन दलासह मुंबई पोलीस, बीएमसी कर्मचारी, 108 अॅम्ब्युलन्स सेवा, आणि बेस्टचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. या एजन्सींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इमारतीचा विद्युत पुरवठा तातडीने खंडित करण्यात आला आहे, ज्यामुळे आगीचा फैलाव रोखण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे.