हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्ष कमालीचा अॅक्टिव्ह झाला आहे. यंदा राज्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. राज्यातील वाढत्या अँटी इन्कम्बसीचा फटका भाजपला बसू शकतो असा काँग्रेस नेत्यांचा कयास आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची नावं निश्चित करताना वरिष्ठांची दमछाक होत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट या दोघांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या राजकीय भेटीने राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. काँग्रेस या दोघांनाही विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
कुस्तीपटू विनेश फोगाट काँग्रेसमध्ये सामील होईल अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. आता फोगाटने राहुल गांधींची भेट घेतल्याचे समोर आल्याने या चर्चांना बळ मिळालं आहे. राजकीय वर्तुळातील चर्चा ऐकल्या तर विनेशला दादरी मतदारसंघातून तिकीट दिलं जाऊ शकतं. तर बजरंग पुनिया बादली मतदारसंघातून इच्छुक आहेत. पण काँग्रेस त्यांना एखाद्य जाट बहुल मतदारसंघातून निवडणुकीत उतरवण्याची तयारी करत आहे.
मोठी बातमी! राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राष्ट्रवादीची तीन नावं फायनल?
राहुल गांधी यांची भेट घेण्याआधी अशी चर्चा होती की विनेश फोगाटने जर राजकारणात येण्याचं ठरवलं तर काँग्रेस पक्षात सहभागी होऊ शकते. विनेशने नुकतीच जींद, रोहतक आणि शंभू बॉर्डर परिसरातील खाप पंचायती आणि येथील शेतकऱ्यांची भेट घेतली होती. येथे विनेशला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. मी ज्यावेळी संकटात होते त्यावेळी शेतकऱ्यांनीच मला सहकार्य केलं असे विनेश म्हणाली होती. ज्यावेळी विनेश फोगाटने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यावेळी काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही विनेशला राज्यसभेत पाठवण्याची मागणी केली होती. वयामुळे ही गोष्ट शक्य नव्हती. विनेशचे काका महावीर फोगाट आणि चुलत बहिण बबिता फोगाट यांनी मात्र काँग्रेसच्या या धोरणावर टीका केली होती.
Rahul Gnadhi विनेशच्या एन्ट्रीने राजकारण बदलणार
विनेश फोगाटची राजकारणातील एन्ट्री राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणू शकतो. खाप पंचायत आणि शेतकऱ्यांचा फोगाटला असलेला पाठिंबा पाहता निवडणुकीत याचा फायदा मिळू शकतो. असं असलं तरी विनेश फोगाटने अजून तरी राजकारणातील प्रवेशाची घोषणा केलेली नाही. जर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विनेशने राजकारणात पदार्पण केलं तर राज्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारी ही घटना ठरू शकते.