राज्यातील जनता गणरायाच्या आगमनाची तयारी करत असतानाच एसटी महामंडळाच्या ( St Employees Strike) कर्मचाऱ्यांनी आजपासूस संप पुकारला आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठीच हा संप सुरू करण्यात आला आहे. ऐन सण उत्सवाच्या काळातच संप पुकारण्यात आल्याने राज्यात अनेक ठिकाणी एसटी वाहतूक कोलमडली आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांतून धावणाऱ्या बस आगारातच उभ्या आहेत. या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होऊ लागले आहेत.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाप्रमाणेच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोलमडण्यास सुरुवात झाली आहे. एसटी बसची चौकशी करण्यासाठी बसस्थानकातील फोन खणखणू लागले आहेत. मात्र प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. मिरज आणि सातारा बसस्थानकांतून फक्त दहा टक्के बस वाहतूक सुरू आहे. कोल्हापुरातून पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या बस सुरू आहेत. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातून जाणाऱ्या सर्व बसेस सध्या बंद आहेत. ज्या बस रात्री मुक्कामी होत्या तेवढ्याच बस बाहेर पडतील असे सांगितले जात आहे. या संपात महामंडळाचे चालक, वाहक आणि वर्कशॉपमधील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक आणि ग्रामीण भागातील सर्व एसटी डेपो बंद आहेत. कर्मचाऱ्यांनी या डेपो बाहेरच आंदोलनाला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. संगमनेर डेपोतून धावणाऱ्या बस सध्या आगारातच उभ्या आहेत. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सरकारकडून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. या संपाला आता राज्यातील अन्य जिल्ह्यांतूनही प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा काढला गेला नाही तर आंदोलनाचे लोण राज्यभरात पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे.