उल्हासनगर :- अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात जमीन वादाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील पोलीस ठाण्यातील (Hill Line Police Station) गोळीबाराच्या घटनेनंतर देखील या भागात शांतीचे वातावरण पुन्हा कधीच स्थिरावलं नाही. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये अजूनही असुरक्षिततेची भावना होती, आणि आता या वादाला पुन्हा एकदा उधाण आले आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
द्वारली गावातील वादग्रस्त असलेल्या जागेला भूमी अभिलेख विभागाने जागेची मोजणी करण्यास स्पष्टपणे मनाई केली होती. मात्र, सोमवारी एका बिल्डरने कायद्याची कोणतीही तमा न बाळगता आपल्या हत्यारबंद सहकाऱ्यांसह जागेचा सर्व्हे सुरू केला. हा सर्व्हे पोलिसांच्या बंदोबस्ताविना केला जात होता, ज्यामुळे गावात एकाच खळबळ उडाली. या हत्यारबंद इसमांनी शेतकऱ्यांवर हल्ला चढवला आणि त्यांना अमानुषपणे मारहाण केल्याचे बोलले जात आहे.
लालपरीला ब्रेक! एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात
हल्ल्याच्या दरम्यान, शेतकऱ्यांनी तात्काळ कल्याण शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. महेश गायकवाड यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि मोठा अनर्थ टाळला. हत्यारबंद इसमांना ताब्यात घेतल्यानंतर गावात तणाव आणखी वाढला होता, मात्र पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे हा वाद पुढे न वाढता थांबवला गेला.
सध्या हिललाईन पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनाक्रमामुळे द्वारली गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, या वादाचा तोडगा निघेपर्यंत गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.