मुंबई – सेंट झेवियर्स महाविद्यालयात (St. Xavier’s College) मराठी वाङ्मय मंडळाचा बहुप्रतिक्षित उद्घाटन सोहळा ४ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात हा कार्यक्रम मंडळासाठी करतो तसेच या कार्यक्रमाद्वारे मराठी वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्यास मदत होते. समृद्ध सांस्कृतिक उपक्रमांनी भरलेल्या वर्षाचा भक्कम पाया रचणारा उद्घाटन सोहळा त्याच्या अनोख्या थीमसाठी ओळखला जातो, ज्यामध्ये सामाजिक समस्या आणि कला ते साहित्य आणि मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अशा विविध विषयांचा शोध घेतला जातो. हा कार्यक्रम मराठी संस्कृतीचा एक आकर्षक उत्सव मनमोहक सादरीकरण, ज्वलंत कथन आणि विचारात्मक पॅनेल चर्चेद्वारे मराठी संस्कृती जपण्यास एक मोलाचा हातभार लावतं आहे.
यंदाच्या कार्यक्रमात मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होणार आहेत. सिनेसृष्टी आणि नाट्यक्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री छाया कदम, प्रसिद्ध पटकथा लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित, मालिका आणि चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते सौरभ गोखले, चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर गाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, आणि होणार सून मी या घरची या मालिकेमधील त्यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले लाडके टेलिव्हिजन अभिनेते शशांक केतकर अशा दिग्गज कलाकारांचा समावेश यंदाच्या पॅनलमध्ये होणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांना अमूल्य अनुभव आणि अंतर्दृष्टी मिळणे अपेक्षित आहे, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अजून वाढेल. या वर्षीचा उद्घाटन सोहळा उत्कृष्टतेची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी व व्यासपीठावर नवी प्रतिभा आणि मराठी वारशाचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज आहे.