संदीप साळवे,पालघर
Jawhar : गणेश मूर्तीकलेने दिला जीवनाला आकारपालघर जिल्ह्यात दुर्गम भाग समजला जाणाऱ्या, जव्हार तालुक्यातील ग्रामीण भाग खरवंद येथे रहाते घर नीट नेटके, कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असली, तरी अंगात कला, कौशल्य असेल, तर त्याला उदरनिर्वाहाचे साधन कसे मिळू शकते, हे येथील मूर्तिकार यतिन रघुनाथ भोये या आदिवासी पदवीधर कलाकाराने दाखविले आहे. मूर्तीकलेच्या छंदातून ते उत्तम मूर्तिकार आहेत. उदरनिर्वाहासाठी त्यांची चालू असलेली धडपड चकीत करणारी आहे. यतिन हे भुमिहीन कुटुंबात जन्मलेले असल्याने लहान पणापासून शेतकामा विषयी प्रचंड आवड, मात्र एवढे कष्ट करूनही अनेकदा, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्न मिळण्यासाठी बाधा ठरते, अनेक प्रकारची कामे करून उदरनिर्वाह करण्याचा मार्ग निवडला परंतु, मूर्ती बनविणे त्यांच्या या कलागुनाने त्यांना सावरले.
यतिन बी. ए. पदवीधर आहे. पत्नीचे शिक्षण आठवी पर्यंत ,त्यांना दोन मुले आहेत, यतिन आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने मूर्ती तयार करून विकतात. नऊ इंच उंचीपासून अडीच फुटापर्यंतच्या मूर्ती ते शाडूच्या माती पासुन तयार करतात. जव्हार, पालघर, ठाणे, मुंबई व नाशिक जिल्ह्यात,तसेच आजूबाजूच्या स्थानिक बाजारपेठेत मूर्ती विकल्या जातात. गेल्या पाच वर्षांत ७०० ते ८०० मूर्ती तयार करून विक्री केल्या आहेत. गणेशोत्सवाच्या तीन ते चार महिने अगोदर मूर्ती तयार करायला सुरुवात करतात. शाडू व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना रासायनिक रंग वापरले जात असल्यामुळे त्या जेवढ्या रेखीव व आकर्षक दिसतात.
तेवढ्या नैसर्गिक रंगामुळे इकोफ्रेंडली मूर्ती दिसत नाहीत, असे यतिन भोये यांनी सांगितले.जव्हार तालुक्यात अनेक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात, आदिवासी संस्कृती असणाऱ्या या भागात मूर्ती पूजा अधिक केली जाते, परिणामी निरनिराळ्या मुर्त्या व मानवी मुखवटा बनवण्याचे काम यतिन हे एक उत्तम चित्रकार , कलाकार व हार्मोनियम वादक असल्याने निसर्गाने त्यांना कलेच्या माध्यमातून समृध्द केल्याचे गावातील मंडळी सांगतात .त्यामुळे त्यांनी खरवंद येथील राहते घरी , गणपती मूर्ती कारखाना रघुनंदन कला केंद्र च्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी सूरू केला आहे. विशेष म्हणजे गणेश मूर्ती बनविण्याचे कोणतेही प्रशिक्षण न घेतलेला हा कलाकार हुबेहूब मूर्ती साकारतो ही बाब विलक्षण असल्याचे मूर्ती खरेदीदार सांगतात. आपल्यापैकी कुणाला सुंदर, सुबक मूर्ती हव्या असल्यास , यतिन भोये यांना ७७९६००२३८५ या भ्रमणध्वनी क्रमांकावरती संपर्क करु शकता.