यंदा कंबोडिया देशात काहीतरी खास घडत आहे. भारतीय पर्यटकांच्या स्वागताची (India Cambodia Relation) जय्यत तयारी या देशाने केली आहे. कंबोडिया पर्यटन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कंबोडिया या वर्षी भारतीय पर्यटकांच्या संख्येत तीन ते चार पट वाढ होईल अशी अपेक्षा करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यात भारतातून कंबोडियात पर्यटनाच्या निमित्ताने गेलेल्या भारतीयांची संख्या ३२ ते ३३ हजारांच्या आसपास होती. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या १७ टक्क्यांनी जास्त आहे.
भारतीय पर्यटकांना कंबोडियात आमंत्रित करण्यासाठी सरकारने एक खास मोहीम सुरू (Tourism) केली आहे. यावर्षी पहिल्यांदाच भारत कंबोडिया पर्यटन वर्ष सुरू करण्यात आले आहे. याद्वारे सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता वाढली आहे. दोन्ही देशांत पर्यटनाचा मोठा विकास झाला आहे. त्यामुळे आता भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक कंबोडियात येतील असे आम्हाला वाटत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
कंबोडियाचे पर्यटन मंत्री सेइला यांनी एका कार्यक्रमात पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले मागील वर्षात जितके पर्यटक कंबोडिया मध्ये आले होते यामध्ये आता तीन ते चार पट वाढ होईल असे वाटते. सन २०२३ मध्ये कंबोडियात ७० हजार पर्यटक आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने येथे आले होते आता आम्हाला असे वाटत आहे की यापेक्षाही जास्त संख्येने भारतीय पर्यटक येथे यावेत. आमच्या पाहुणचाराचा स्वीकार भारतीय पर्यटकांनी करावा.
कंबोडिया भारत पर्यटन वर्ष २०२४ अभियानचे उद्दिष्ट दोन्ही देशांत पर्यटनाची भागीदारी निश्चित करणे आहे. यामुळे कंबोडियाच्या पर्यटन क्षमतेत वाढ होणार आहे. अशा पद्धतीची मोहीम पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. भारतीय पर्यटकांच्या मदतीसाठी सीएम रिप २०२४ नावाने आणखी एक अभियान सुरू करण्यात आले आहे. कंबोडियातील विविध पर्यटन ठिकाणांच्या बाबतीत जागरूकता वाढविण्याचे काम या अभियानातून होणार आहे. पर्यटकांना मदत करण्याचाही मुख्य उद्देश या अभियानात असल्याचे सेइला यांनी सांगितले.
कंबोडियातील पर्यटनाचा भारतात प्रचार करण्यासाठी इन्फ्ल्यून्सर आणि प्रभावशाली व्यक्तींची मदत घेतली जात आहे. भारत आणि कंबोडिया या देशांदरम्यान सध्या फक्त चार फ्लाईट सुरू आहेत. नजीकच्या काळात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीयांना कंबोडिया मध्ये पोहोचल्यानंतर विजा सुविधा मिळते. कंबोडियाच्या दिल्लीतील दूतावासातूनही विजा उपलब्ध करून दिला जातो. तसेच ई विजा देखील जारी केला जातो.