Balasaheb Thorat : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत आणि बदलापूर अत्याचार घटनेत हिंदुत्वादी संघटनांशी निगडीत आरोपी आहेत. तसे आरोपच होत आहे. कारवाई होत नसल्याने तेच दर्शवते. उलट यात राजकारण होते आणि संरक्षण दिले जात आहे, असा गंभीर आरोप करत संरक्षण देणारे कोण? संरक्षण देणारे देखील तेवढेच गु्न्हेगार असून त्यांना देखील आरोपी करून शिक्षा केली पाहिजे, असा घाणाघात काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नाव न घेता केला.मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेधासाठी महाविकास आघाडीने राज्यभर जोडे मारो आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला राज्य सरकारने परवानगी नाकारली होती. बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्यात महायुती भाजप सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इव्हेंटबाजीवर जोरदार हल्ला चढवला.बाळासाहेब थोरात म्हणाले, “‘मविआ’च नाही, तर निव्वळ, संपूर्ण महाराष्ट्र आणि देश निषेध करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची आस्था खोटी आहे. त्यांची माफी खोटी आहे. केवळ निवडणुका जवळ आली, म्हणून ही माफी दिसते. छत्रपती शिवाजी महाराज देशाचे श्रद्धास्थान आहे. छत्रपती आणि सावरकरांची तुलना कशी होऊ शकते. ती करणे हे आणखी निषेधार्य आहे”.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इव्हेंटबाजीवर निशाणा साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “इव्हेंट करायचा म्हणून, कोट्यवधीचा खर्च केला. मलिदा वाटण्याचा कार्यक्रम झाला. भ्रष्टाचार झाला. नफेखोरी झाली. त्याचा हिशोब ही जनता मागत आहे. देशात 100-100 वर्षापूर्वीचे पुतळे उभे आहेत. ते सुस्थितीत आहे. परंतु यांच प्रेम खोटं, श्रद्धा खोटी, देशप्रेम खोटं आणि आमच्या महापुरूषांवरची श्रद्धा देखील खोटी!” भाजपचे फक्त सत्तेला हापापले आहेत, हे यातून सिद्ध झाल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
चुकीला माफी असते, गुन्ह्याला शिक्षा असते
मविआ आंदोलन करत आहे, तो श्रद्धेचा भाग आहे. निषेध होणारच, असे ठणकावून सांगत बाळासाहेब थोरात यांनी महायुतीच्या राजकारणावर जोरदार निशाणा साधला. भ्रष्टाचार करणाऱ्यांना इथं संरक्षण दिले जात आहे. त्यांना अटक व्हायला हवी होती, त्यांना संरक्षण दिले जात आहे. भाजपला प्रत्येक ठिकाणी राजकारण दिसते. बदलापूरच्या घटनेच्या निषेधात हजारो लोक रस्त्यावर आले. तिथे देखील त्यांना राजकारण दिसले. प्रत्येक गोष्टीकडे राजकीय इव्हेंट म्हणून पाहतात. छत्रपतीच्या बाबतीत झालेली गोष्टीत क्षमा नाही. चुकीला माफी असते. गुन्ह्याला शिक्षा असते. त्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने गुन्हा केला आहे. यांना शिक्षा दिल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.