शिंदे गटाचे नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. आधी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वक्तव्य करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता. आता पुन्हा त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावेळी सावंत शेतकऱ्यांवरच घसरले. शेतकऱ्यांनी त्यांना सार्वजनिक पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर सावंतांनी थेट शेतकऱ्यांची औकातच काढली. धाराशिव जिल्ह्यातील वाशी या गावात हा प्रकार घडला. सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांवरच संताप व्यक्त केला.
खरंतर या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता. मात्र या प्रश्नावर सावंत चांगलेच संतापले. सगळ्यांनी आपापल्या औकातीत राहून बोलायचं आणि आपल्या औकातीत विकास करून घ्यायचा. मी ऐकून घेतो म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलायचं आणि मी ऐकून घ्यायचं. कुणाची तरी सुपारी घेऊन येथे बोलायचं नाही. चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही. आम्हीही उडत्याची मोजतो. तेव्हा प्रत्येकाने आपापल्या औकातीत राहून बोलायचं आणि विकास करून घ्यायचा अशा शब्दांत मंत्री सावंत यांनी शेतकऱ्यांना दरडावले.
मंत्री तानाजी सावंत शुक्रवारी गाव संवाद दौऱ्याच्या निमित्ताने तालुक्यात आले होते. तालुक्यातील वाशी, पारा, पिंपळगाव या गावांत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना बंधाऱ्याच्या दरवाजासंबंधी प्रश्न विचारला. बंधाऱ्यांची दुरावस्था झाली असून त्याबाबत काय करता येईल असे विचारले. यावेळी तानाजी सावंत यांनी येत्या 10 सप्टेंबरपर्यंत बंधाऱ्यांना दरवाजे बसवू असे सांगितले. दरवाजे बसवले तरी दुरुस्ती होणेही आवश्यक आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. त्यावर मी सुद्धा इंजिनिअर आहे कुणाची तरी सुपारी घेऊन येथ बोलायचं नाही. सुपारीबाजांना मी घाबरत नाही असे म्हणत शेतकऱ्यांनाच दरडावले.