आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकामध्ये टीकेच्या फैरी झडत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका करत असतात. राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेवरून राऊतांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याला आता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर काहींना अपचन होतं, असा खोचक टोला फडणवीसांना राऊतांना लगावला.
कामगार पोलीस पाटील संघाचे 8 वे अधिवेशन नागपूरमध्ये संपन्न झाले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मी गृहमंत्री आहे. पण, पोलीस पाटील हे देखील आपल्या गावचे गृहमंत्रीच आहेत. कारण, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आपला मोलाचा वाटा आहे. गृहमंत्री म्हणून काम करतांना शिव्याच जास्त खाव्याच लागतात. काही लोकांचा शौक तर असा की, सकाळी उठल्यानंतर कॅमेऱ्यावर येऊन माझा राजीनामा मागितला नाहीततर त्यांना अन्नच पचत नाही, एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर त्यांना अपचन होतं, असा टोला फडणवीसांना संजय राऊतांचे नाव न घेता लगावला.
लवकरच मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार
पुढं बोलतांना फडणवीस म्हणाले, पोलीस पाटील पद मानाचं होतं, पण सन्मानाचं नव्हतं. मानाच्या पदाला सन्मान मिळणं गरजेचं होतं. पोलीस पाटील संघटनेचे लोक मला सांगायचे की, आम्हाला बिन पगारी, फुल अधिकारी म्हणून हिनवल्या जातं. त्यामुळं तुम्हाला फुल पगारी, फुल अधिकारी असाच दर्जा आम्ही देणार आहोत. अनेकांनी पाठपुरावा केल्यानंतर तीन हजार रुपयांवरून साडेसहा हजार मानधन केलं. पण, 21 शतकात सहा-साडेसहा हजार फार कमी मानधन होतं. त्यामुळं छातीला लावा माती लावून पंधरा हजार रुपये मानधन केलं. आता अपर मुख्य सचिवांना त्याबाबतच जीआर काढण्याचे आदेश दिले. लवकरच पैसे जमा होतील. दर महिन्याला पैसे खात्यात येतील, असं फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis पोलीस पाटलांचे निवृत्तीचे वय 65 वर्ष करणार…
फडणवीस म्हणाले, अंगणवाडी सेवकांचं वय साठवरून पासष्ट केलं. पोलिस पाटलांच वय साठवरून पासष्ट करावं, या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे. मंत्रिमंडळाशी चर्चा करून यावर निर्णय घेणार आहोत. शिवाय, जेव्हा पोलीस पाटील रिटायर होतात, तेव्हा त्यांना काहीच मिळत नाही. त्यांना रिटायरमेंटनंतर काहीतरी मिळालं पाहीजे, यासाठी सरकार निर्णय घेईल, असं फडणवीस म्हणाले. पोलीस पाटलांचा सन्मान पोलीस अधिकारी आणि महसुली अधिकऱ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी जीआर काढून पोलीस विभागाला आणि महसूल विभागाला पाठवू. त्यांना अपमानीत व्हावं लागणार नाही. मुंबईला गेल्यानंतर या मुद्यावर तात्काळ निर्णय घेण्याकरिता एक कमिटी तयार करून या सगळ्या मद्द्यांचा निकाल आम्ही लावू, असं फडणवीस म्हणाले.