जव्हार
बदलापूर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, पुन्हा जव्हार सारख्या दुर्गम तालुक्यात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर परप्रांतीय मजुराकडून लैंगिक अत्याचार होतो, ही बाब मुली व महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भयावह आहे. दरम्यान, तालुक्यातील ओझर गावात बुधवारी दुपारी सुमारे ३.३० ते ५ वाजता ही लैंगिक अत्याचाराची घटना घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती जव्हार (Jawhar) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी दिली.
बुधवारी सकाळी ११ वाजता पिडीताचे आई व वडील शेतावर गेले असता, तिला आई वडिलांनी त्यांच्या आजी आजोबा सोबत सोडून ते शेतात काम करण्यासाठी गेले. बी एस एन एल टॉवरच्या उभारणीच्या कामासाठी आलेल्या चार परप्रांतीय मजुरांना राहण्यासाठी शेतावरील घराच्या पडवीत जागा दिली होती.त्यापैकी १९ वर्षीय इस्तियाक अन्सारी ह्याने एकांताचा फायदा घेत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली.
संध्याकाळी मुलीची आईने पीडितेची आंघोळ घालताना ती रडू लागली त्यावेळी आईने विचारले का रडते त्यावेळेस पिडीतेनी घडलेली सगळी हकीकत सांगितली असता ही घटना उघडकीस आली. चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जव्हार व मोखाडा तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जव्हार शहरातील क्रांती चौक येथे गुरुवारी सकाळी ११ : ३० वाजता निषेध आंदोलन करीत दोषिला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.या वेळी जव्हार तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने देखील निषेध आंदोलन करण्यात आले.