23.1 C
New York

Congress : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना बदालपूर घटनेचा विसर? काँग्रेसने केले ‘हे’ आवाहन

Published:

नवी दिल्ली

कोलकाता, बदलापूरच्या घटनांसोबतच ठिकठिकाणी महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराने देश ढवळून निघाला आहे. यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी कोलकाताच्या (kolkata) घटनेवर दुःख व्यक्त केले मात्र बदलापूरचा (Badlapur) उल्लेख केला नसल्याने काँग्रेसने (Congress) थेट राष्ट्रपतींवर निशाणा साधला आहे.

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी राष्ट्रपतींनी भाजपशासित राज्यांमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेवरही चिंता व्यक्त करावी आणि केंद्र सरकाराला याचा जाब विचारावा अशी मागणी केली.

अलका लांबा म्हणाल्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे वक्तव्य बरेच काही सांगून जाते. भाजपच्या कार्यकाळात देशभरात महिलांसाठी किती भयावह स्थिती ओढावली आहे हे दिसून येते. असे असताना त्यांना फक्त कोलकताची घटना आठवली. इतर राज्यांमध्ये घडलेल्या घटनेवर त्यांनी भाष्य केले नाही.

मणिपूर राज्य जळत असताना, महिलांना अपमानित केले जात असताना त्यांनी एका शब्दाने याचा उल्लेख केला नाही. मणिपूरच्या तत्कालीन राज्यपालांनी राष्ट्रपतींना भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र राज्यपालांनाच हटवण्यात आले. खेळाडू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनासुद्धा राष्ट्रपतींनी भेटण्याची वेळ दिली नाही, असे अलका लांबा म्हणाल्या.

आत्ता आमची राष्ट्रपतींना विनंती आहे की त्यांनी केंद्र सरकार सांगून देशाला बलात्कारांपासून वाचवावे. काही आरोपींना सरकारच संरक्षण देत आहे. त्यामुळे आरोपींना भीती राहिली नाही.महिलांना विधानसभेच्या निवडणुकीत तत्काळ 33 आरक्षण देण्यात यावे. याकरिता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशीही मागणी यावेळी अलका लांबा यांनी केली.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात न्याय समिती काँग्रेसतर्फे स्थापन केली जाणार आहे. त्यात वकिल, डॉक्टर इतर कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात येईल. या समितीची स्थापना नागपूरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी अलका लांबा यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img