हिंगोली
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) जन सन्मान यात्रा सुरू आहे, सुरुवातीपासूनच ही यात्रा अजित पवारांच्या गुलाबी रंगाने (Pink) चर्चेत आली होती, आधी अजितदादांच्या अंगावरील गुलाबी जॅकेट (Pink Jacket) आणि त्यानंतर यात्रेतील गुलाबी रंगाच्या बस सगळ्यांचाच लक्ष वेधून घेत होत्या. मात्र आता तर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पारंपारिक ध्वजाचा रंग देखील बदलला आहे.
हिंगोलीच्या वसमत शहरात जनसन्मान यात्रेच्या प्रमुख मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे चिन्ह असलेल्या घड्याळाच्या चहूबाजूने गुलाबी रंग असलेले ध्वज लावले आहेत. दरम्यान पूर्वी गुलाबी, केशरी आणि हिरवा रंग असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज देखील आता गुलाबी झाल्याने पुन्हा एकदा अजितदादांच्या गुलाबी रंगाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून एक विशेष रणनीती आखण्यात आलीये. पक्षाला एक नवा रंग, रुप देण्याची तयारी अजित पवार गटाकडून करण्यात येतेय. यासाठी अजित पवार गटाकडून गुलाबी रंगाचा वापर प्रत्येक ठिकाणी करण्यात येत असल्याचं दिसून येतंय. अजित पवारांनी देखील आपल्या दैनंदिन जीवनात गुलाबी रंगाचा वापर वाढवल्याचं दिसून येतंय. अजित पवारांनी राज्याचा बजेट मांडला तेव्हा देखील त्यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं. 9 जुलैला अजित पवारांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. दरम्यान यावेळी अजित पवार गटाच्या आमदारांच्या खांद्यावर गुलाबी रंगाचंच उपरणं दिसून आलं. दरम्यान त्याच दिवशी अजित पवार गटाकडून विधानसभांच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं. तेव्हाही अजित पवारांनी गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान केलेलं दिसलं. तर इतर आमदारांच्या खांद्यावर गुलाब रंगाच उपरणे पाहायला मिळाले.
विधानपरिषदेच्या निकालाच्या दिवशी देखील अजित पवारांनी गुलाब रंगाचं जॅकेट घातलं होतं. 14 जुलैला बारामतीत अजित पवार गटाकडून जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान यावेळी सभेचा संपूर्ण परिसर आणि स्टेज हा गुलाबी करण्यात आला होता. दरम्यान याच सभेत अजित पवारांनी गुलाब जॅकेट घालून जनतेला संबोधित केलं होतं. एवढचं नव्हे तर अजित पवार गटाकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये देखील गुलाबी रंगाचा वापर करण्यात येतो आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्याने नेमलेल्या नरेश अरोरा यांच्या टीमने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही कँपेनिंग सुरु केली आहे. नरेश अरोरांच्या कंपनीने कर्नाटकमध्ये डी.के शिवकुमार यांच्यासाठी काम केलंय. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यासाठीही अरोरा यांच्या कंपनीनं काम केलंय. दरम्यान आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अरोरा यांची कंपनी काम करतेय.