मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ (Chhatrapti Shivaji Maharaj) असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला (Shivaji Maharaj Statue) पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक शिवप्रेमींसह संघटना अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी (Shivaji Maharaj) तत्काळ कारवाईची मागणी केली. यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सत्ताधाऱ्यांकडूनही या टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. आता राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
हा तर एक अपघात आहे. हा पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पंतप्रधान मोदी येणार होते. त्यामुळे काम खूप लवकर करण्यात आले होते. या कामाचं अनेकांनी कौतुकही केलं होतं. सदर पुतळा कोसळणे दुर्दैवीच आहे. पण यातून काही चांगल्या गोष्टी घडू शकतात, असे शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी सांगितले.
दीपक केसरकर म्हणाले, आधीचा पुतळा 28 फूट उंच होता. येथील लोकांची इच्छा आहे की पुतळा 100 फुटांचा असावा. त्यामुळे आता जर याठिकाणी शंभर फुटांचा पुतळा उभारला जात असेल तर ही सर्वांसाठी अभिमानाचा गोष्ट ठरेल. मी राजकोट किल्ल्याचा दौरा करून पाहणी करणार आहे. यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहे. मी येथील रहिवासी आहे. पण नौदलाकडून येथे पुतळा उभारण्यात येणार होता. त्यामुळे आम्ही जास्त काही बोलू शकलो नाही. आता या ठिकाणी आम्ही मोठा पुतळा नक्कीच उभारणार आहोत.
दरम्यान, या घडामोडी घडत असतानात पुतळा उभारणीचं कंत्राट ज्याला मिळालं होतं त्या जयदीप आपटे या तरुणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या तरुणाला फक्त दीड ते दोन फूट पुतळे साकारण्याचा अनुभव होता. त्याने स्वतःच एका मुलाखतीत दिली होती. आता या गोष्टीची सरकारला माहिती नव्हती का? इतका कमी अनुभव असलेल्या तरुणाला काम दिलंच कसं? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे गतवर्षी साजऱ्या झालेल्या नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उभारण्याचं कंत्राट मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं. जयदीप आपटे हा या कंपनीचा मालक, तर चेतन पाटील सल्लागार आहेत. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.