मुंबई
मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा (Dahi Handi) उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगली आहे. मुंबईत (Mumbai) जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरु असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी (Govinda Injured) झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत आतापर्यंत 15 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत विविध पथकातील 15 गोविंदा जखमी झाले आहे. या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील केईएम रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 4, सायन रुग्णालयात 2, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये 1, पोद्दारमध्ये 4, राजावाडीमध्ये 1, एमटी अगरवार रुग्णालयात 1 आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. या सर्व जखमी गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
मुंबई आणि ठाण्यात जवळपास 1 हजार 354 दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर ठाण्यात टेंभी नाक्याला मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी असून बक्षिसाची रक्कम पुरुषांसाठी 1 लाख 51 हजार, महिलांसाठी 1 लाख आहे. त्याशिवाय प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत 1 लाख रुपयाच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.