मुंबई
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण (Vasant Chavan Passes Away) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. वसंतराव चव्हाण यांनी प्रतिकूल परस्थितीत एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेस (Congress) विचार सोडला नाही, त्यांच्या निधनाने अनुभवी लोकप्रतिनिधी व काँग्रेस विचारांचा एक निष्ठावान पाईक हरपला आहे, अशा शोक भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केल्या आहेत.
आपल्या शोकसंदेशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, खा. वसंतराव चव्हाण यांनी सरपंचपदापासून राजकीय कारकिर्द सुरु केली, त्यानंतर जिल्हा परिषद व विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नांदेड मतदारसंघातून विजय मिळवून राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास सुरुवात केली होती. नांदेड जिल्ह्यातील पक्ष संघटना वाढीत त्यांचा मोठा वाटा होता. खा. वसंतराव चव्हाण मनमिळावू, प्रामाणिक व मितभाषी स्वभावाचे होते, त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.
खा. वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष या कठिण प्रसंगी चव्हाण कुटुंबियांसोबत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.