विधानसभा निवडणुका जवळ आल्याने इच्छुक उमेदवारांचे इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू झालं आहे. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते याचा अंदाज घेऊन इच्छुक उमेदवार त्या त्या पक्षात प्रवेश करत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत अशीच परिस्थिती दिसून येत आहे. यातच आता भाजपाला टेन्शन देणारी बातमी आली आहे. शरद पवारांनी मोठा डाव टाकला असून इंदापूरप्रमाणेच साताऱ्यातही मोठा नेता तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी साताऱ्यातील भाजप नेते मदन भोसले यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या पक्षातील नेते फोडून आपला पक्ष वाढविणाऱ्या भाजपला आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जशास तसं उत्तर मिळू लागलं आहे.मिळालेल्या माहितीनुसा, जयंत पाटील आज सकाळी मदन भोसले यांच्या घरी गेले होते. या भेटीत त्यांनी शरद पवार गटात या असा प्रस्ताव भोसलेंसमोर मांडला असाव अशी शक्यता आहे. पण याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र तरीही अशी शक्यता जर प्रत्यक्षात आली तर वाई मतदारसंघातील राजकीय गणिते निश्चितच बदलणार आहेत. याचा भाजपला मोठा फटका बसण्याचीही शक्यता आहे.
पुण्यातील भाजपचा ‘हा’ बडा नेता तुतारी हाती घेण्याच्या तयारीत..
या भेटीनंतर जयंत पाटील हसतहसत बाहेर पडले. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. भाजपमधील सर्वच जण माझे मित्र आहेत अशी त्रोटक प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि निघून गेले. परंतु, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मदन भोसले भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता जरी या प्रश्नाचं उत्तर देता येणं शक्य नसलं तरी लवकरच या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्के देण्याची रणनीती शरद पवार गटाने आखल्याचे दिसत आहे. कोल्हापुरातील समरजितसिंह घाटगे शरद पवार गटात प्रवेश घेतील हे आता निश्चित झालं आहे. तसेच इंदापुरातही हर्षवर्धन पाटील यांची चर्चा सुरू झाली आहे. तेही तुतारी फुंकतील असे सांगितले जात आहे. अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनीही आजच शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे अजित पवारांचे टेन्शन वाढले आहे.