राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर दिल्लीतील नेत्यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव (PM Modi) दौऱ्यावर येणार आहेत. भाजपने त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. पण, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांंच्या नाराजी नाट्यावरून या आयोजनात मिठाचा खडा पडला आहे. खडसेंचा अद्याप अधिकृत भाजप प्रवेश झालेला नाही. त्यांचा प्रवेश का रखडला याची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत.
खडसे भाजपात येण्यासाठी तयारच आहेत. परंतु, अजून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यात आज मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निरोप खडसेंना मिळालेला नाही. या मुद्द्यावर राजकारण ढवळून निघाले आहे. शासकीय कार्यक्रम असल्याने सर्व आमदारांना कार्यक्रमाचे निमंत्रण देणे बंधनकारक होते. मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालेलं नाही वेळेत निमंत्रण मिळालं असतं तर कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र आता निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही, असे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पीएम मोदींच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता प्राइम इंडस्ट्रीयल पार्क परिसरात लखपती दीदी संमेलन होणार आहे. मोदी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील. यानंतर 11.15 ते 12 या वेळेत बचतगटाच्या महिलांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर इंडस्ट्रीयल पार्क येथील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.