अमरावती
सर्वात आधी मला बंदुक द्या, मला बंदुकीची जास्त गरज आहे असं खळबळजनक वक्तव्य भाजपचे (BJP) खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलं आहे. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचारच्या निषेधार्थ अमरावती शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चामध्ये विविध हिंदू संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत होते. या मोर्चात भाजपचे खासदार अनिल बोंडे, नवनीत राणा देखील सहभागी झाल्या होत्या.
मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. बांगलादेशात जे हिंदू मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करणार आहेच. पण मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या.
त्यांनी परवानगी दिली तर मी अमरावतीमध्ये सर्व महिलांना माझ्याकडून बंदूक देईन. त्यामध्ये दोन-तीन लोकं मेले तरी चालतील, पण चुकीचा माणूस वाचता कामा नये, त्याचं मी समर्थन करेल आणि त्यामध्ये लागणाऱ्या कोर्ट कचेरीचा खर्चही मी करेन. असं वक्तव्य त्यांनी केलं.
दरम्यान, नानकराम नेभनानी यांच्यानंतर भाषण करताना अनिल बोंडे यांनी सर्वात आधी मला बंदूक द्या मला तिची जास्त गरज असल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं असून सत्ताधारी पक्षातील लोकांनीच कायदा हातात घ्यायची भाषा केली तर कायदा आणि सुव्यवस्थेचं काय होणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.