परभणी
येत्या काही दिवसांतच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) मेळावे घेतले जात आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षानेही (Aam Aadmi Party) महाराष्ट्र विधानसभेसाठी शड्डू ठोकला. आपने आज तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. आपने परभणीतून सतीश चकोर (Satish Chakor) यांची उमेदवारी जाहीर केली.
आम आदमी पक्षाने आतापर्यंत मराठवाड्यातील तीन जागांची घोषणा केली. याआधी बीड, लातूर विधानसभेसाठी आपने उमेदवार घोषित केले. आम आदमी पक्षाच्या राज्य संघटकांनी ही घोषणा करण्यात केली होती. तर आज आम आदमी पार्टीचे राज्य संघटक संग्राम पाटील यांनी पत्रकार परिषदेत सतीश चकोर यांच्या नावाची घोषणा केली. त्यांना परभणीतून उमेदवारी दिली आहे.
यावेळी संग्राम पाटील म्हणाले की, दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार असून त्या सरकारने दिल्लीत लोककल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्यात. आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीकरांना मुलांचे शिक्षण असेल किंवा 300 युनिटपर्यंत मोफत वीज, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत सोयीसुविधा दिल्या आहेत. त्यामुळेच आम आदमी पक्षाने दिल्लीनंतर पंजाबमध्ये आपले सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातही आप सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, एकीकडे आम आदमी पार्टी हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. तर दुसरीकडे ते एक एक उमेदवार जाहीर करत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतच फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.