मुंबई
मुंबई महापालिकेचे (BMC) माजी आयुक्त तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे अतिरिक्त सचिव इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. इक्बालसिंह चहल यांच्याकडे आता गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इक्बालसिंह चहल यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव म्हणून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एका पदावर, जिल्ह्यात किंवा मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. या आदेशानुसार इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आली होती. चहल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची बदली करण्यात आली आहे.