रमेश औताडे, मुंबई
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि बृहन्मुंबई राज्य सरकारी संघटनेने दिलेल्या संपाच्या (Government Employees Strike) हाकेनुसार २९ ऑगस्टच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मिनिस्ट्रियल स्टाफ असोसिएशन आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई आरोग्य भवन येथे द्वार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाचे अध्यक्ष संजय मंडले, कोषाध्यक्ष विजय पोस्टूरे तसेच बृहन्मुंबई जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या महिला संघटक कविता ठोंबरे, जी एस टी संघटनेचे संतोष सरवदे उपस्थित होते. यावेळी संजय मंडले यांनी बेमुदत संपाची पार्श्वभूमी सांगत एन पी एस NPS धारकांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चळवळ जाणून घेणे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्त्वाच्या आदेशाचे पालन करुन संपात १००% सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
या संपामुळे जे लाभ मिळणार आहेत ते मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न संपाच्या माध्यमातून करुया तसेच उर्वरित लाभासाठी पुन्हा संघर्षाची तयारी ठेवावी लागली तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याची तयारी ठेवा असे मत व्यक्त केले. तर कविता ठोंबरे यांनी विस्तृतपणे संपामध्ये मिळवलेल्या सर्व बाबींची मांडणी केली. महिला वर्गांनी सुद्धा नेहमीप्रमाणे याही संपामध्ये १०० टक्केसहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त करुन संघशक्तीचे दर्शन घडवावे असे आवाहन केले.
द्वारसभेच्या दरम्यान, स्थानिक संघटनेचे अध्यक्ष विलास तरटे, उपाध्यक्ष जितेंद्र नागवेकर व सचिव बाबासाहेब साळवे इतर पदाधिकारी आणि आरोग्य भवन विभागातील बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.