21 C
New York

Sanjay Nirupam : विरोधकांनी बदलापूरमध्ये मणिपूरचा ट्रेलर दाखवला का?- संजय निरुपम

Published:

मुंबई

बदलापूर घटनेवर सरकारने संवेदनशीलपणे हाताळले आहे मात्र विरोधकांनी यावर राजकारण केले. काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचा लवकरच मणिपूर होईल, असे भाकीत केले होते. मग बदलापूरमध्ये मणिपूरचा ट्रेलर होता का अशी सणसणीत टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी शरद पवारांवर केली. राजकीय स्वार्थासाठी ऐन सणासुदीत महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या व्यवहारात विकृती असल्याचा घणाघात निरुपम यांनी केला. साधुसंताच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र आहे. शरद पवार आणि विरोधक राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारच्या हिंसाचार घडवून आणू शकतात असा गंभीर आरोप निरुपम यांनी यावेळी केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत निरुपम यांनी विरोधकांचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला.

ते पुढे म्हणाले की, बदलापूर घटनेनंतर सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची घोषणा केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सर्व शाळांमध्ये सखी सावित्री समिती, विशाखा समिती आणि सीसीटीव्ही कार्यरत करण्याचे आदेश दिले. सरकारकडून हे प्रकरण प्राधान्याने हातळण्यात येत आहे, असे निरुपम म्हणाले. मात्र निवडणूक डोळ्यासमोर असल्याने या प्रकरणाचे विरोधक राजकारण करत आहेत, असा आरोप निरुपम यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात उल्लेख केलेले प्रकरण मावळ येथील आहे. या बलात्कार आणि हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला १५ महिन्यांत फाशीची शिक्षा सुनावली होती, असे निरुपम म्हणाले. टीका करण्यापूर्वी या खटल्याची विरोधकांनी माहिती घ्यायला हवी, असे निरुपम म्हणाले.

बदलापूरातील स्थानिकांनी शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांच्या दिरगांईवर बोट ठेवले. शाळा व्यवस्थापन सरकारने बरखास्त केले असून त्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या शाळेवरील व्यवस्थापनावर सर्वच पक्षाचे नेते आहेत, असेही ते म्हणाले. या शाळेतील विद्यार्थींनींच्या सुरक्षेबाबत योग्य खबरदारी घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असे निरुपम म्हणाले. पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत कारवाई केल्याचे ते म्हणाले. आंदोलकांमध्ये अनेकांनी मद्यपान केले होते. ते बाहेरुन आले होते. त्यामुळे राजकारणासाठी विरोधकांनी मद्यपान केलेल्या बाहेरच्या गुंडाना बदलापुरात आणले होते का असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार आणि काँग्रेसकडून बदलापूर घटनेचे राजकारण करणे ही त्यांच्यातील विकृती आहे, अशी टीका निरुपम यांनी केली. उबाठा यांचा पक्ष संपला आहे. त्यामुळे महिन्याच्या चौथ्या शनिवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. यावेळी सरकारी कार्यालये बंद असतील केवळ व्यापाऱ्यांना छळण्यासाठी हा बंद घोषीत केला आहे, अशी टीका त्यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img