23.1 C
New York

Central Railway : मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे डोंबिवलीत काळ्या फिती लावून आंदोलन

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरी रेल्वे प्रवाशांनी गुरुवारी डोंबिवली स्थानकावर एक अनोखा आंदोलनात्मक उपक्रम राबवला. मध्य रेल्वेच्या (Central Railway) नियमित विलंब आणि लोकल गाड्यांची कमी यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी “काळी फित” बांधून आणि पांढरे कपडे घालून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाला 10 हजारांहून अधिक प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आंदोलनाच्या आयोजनामध्ये विविध प्रवासी संघटना एकत्रित आल्या होत्या. उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीच्या प्रवाशांनी या आंदोलनात सहभाग घेतला. महासंघाचे अध्यक्ष लता अरगडे, उपाध्यक्ष अनिकेत घमंडी, कौस्तुभ देशपांडे, रेखा देढिया, तन्मय नवरे, शशांक खेर, सागर घोणे आदी प्रमुख पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते.रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि त्यासोबतच रोजच्या धावपळीच्या आयुष्यात रेल्वेच्या नियमित उशिरामुळे डोंबिवलीतील प्रवासी प्रचंड त्रासलेले आहेत. रेल्वेचे वेळापत्रक सुधारणे, अतिरिक्त फेर्‍या चालविणे, महिलांसाठी विशेष लोकल गाड्या आणि शटल सेवा सुरू करणे यांसारख्या मागण्या या आंदोलनामध्ये पुढे आल्या. आंदोलनाच्या दरम्यान डोंबिवली रेल्वे स्थानकावर शांततेत आंदोलन संपन्न झाले. “आता तरी जागे व्हा” या टॅगलाईनखाली प्रवाशांनी काळ्या फिती बांधल्या आणि शांतपणे रेल्वे प्रवास केला. रेल्वे पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनीदेखील प्रवाशांचे सहकार्य केले.आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, त्यामुळे शांततेत आंदोलनाची सांगता झाली.

मध्य रेल्वेच्या डोंबिवली हे मुंबईच्या उपनगरांपैकी एक अतिशय गर्दीचे आणि महत्वाचे स्थानक आहे. तिथून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. परंतु, या स्थानकाला योग्य त्या पायाभूत सुविधा आणि रेल्वेची वेळेवर सेवा मिळत नाही. मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांना प्राधान्य दिल्याने लोकल गाड्या उशिराने धावतात. लोकल गाड्यांची कमी, अतिरिक्त फेर्‍यांची आवश्यकता, सीएसएमटी वरून ठाणे-कर्जत शटल सेवा सुरू करण्याची गरज यांसारख्या मुद्द्यांवर आंदोलनात विशेष लक्ष केंद्रित केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img