मुंबई
बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार (Badlapur Rape Case) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सध्या महाराष्ट्रसह देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या घटनेविरोधात काल बदलापूरमध्ये पालकांनी तीव्र रेल रोको आंदोलन केलं होतं. दरम्यान, बदलापूरमधील घटनेवरून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. लाडकी बहीण योजनेच्याद्वारे (Ladki Bahin Yojana) स्वतःचं कौतुक करून घेणाऱ्यांनी तिचं रक्षण करणे आपलं पहिलं कर्तव्य नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.
याबाबत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात की, आज सरकार लाडकी बहीण योजनेच्याद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मग्न आहे. पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, पहिलं कर्तव्य नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही असा टोला राज ठाकरे यांना CM एकनाथ शिंदे यांना लगावला.
जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय, याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं.