8.4 C
New York

Badlapur : वकिलांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श; आंदोलकांच्या न्यायासाठी मोफत लढा देणार

Published:

उल्हासनगर

बदलापूरातील एका (Badlapur) गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असली, तरी संतप्त नागरिकांनी आपल्या न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर, बदलापूर, आणि कल्याण येथील वकिलांनी सामाजिक बांधिलकी जपत, या आंदोलकांच्या बाजूने मोफत न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे न्यायासाठी लढणाऱ्या नागरिकांना वकिलांकडून मोठा आधार मिळणार आहे.

बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या भयानक घटनेने संपूर्ण शहराचे वातावरण तणावग्रस्त केले आहे. या घटनेत प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांच्या रोषामुळे बदलापूर शहरात मंगळवारी “बदलापूर बंद”चे आवाहन करण्यात आले होते. आदर्श विद्यामंदिर शाळेसमोर जमलेल्या संतप्त जमावाने शाळा बंद करण्याची आणि आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती.

मात्र या “बदलापूर बंद”ने आंदोलनाचे उग्र रूप घेतल्याने काही वेळातच रस्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलने सुरू झाली. तब्बल १० तास चाललेल्या रेल्वे रोकोनंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे जमाव पळून गेला आणि रेल्वे मार्गावरची परिस्थिती शांत झाली. शांततेत सुरू झालेले हे आंदोलन हळूहळू अधिक तीव्र झाले, ज्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांना अटक केली आणि सुमारे ३०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल केले.

या कठीण परिस्थितीत उल्हासनगर, बदलापूर आणि कल्याण येथील वकिल संघटनानी सामाजिक बांधिलकीचा आदर्श उभा केला आहे. त्यांनी निर्णय घेतला आहे की, ते आंदोलकांची बाजू न्यायालयात मोफत लढणार आहेत. वकिल संस्थांनी त्यांच्या सामाजिक जबाबदारीचे भान राखत, या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे वचन दिले आहे. तसेच, कोणीही आरोपी अक्षय शिंदे यांचे वकीलपत्र घेऊ नये असे आवाहन ऍडव्होकेट संजय सोनावणे, उमेश केदार, वैशाली बनसोडे, प्रवीण अटकळे, कल्पेश माने, निखिल शिंदे, प्रियेश जाधव, महेश माळवे यांच्यासह इतर वकिलांनी केले आहे. या घटनेचा निषेध म्हणून सर्व वकिलांनी उल्हासनगर न्यायालयात लाल पट्टी हातावर बांधून आपला रोष व्यक्त केला.

या निर्णयामुळे उल्हासनगरातील वकिलांची सामाजिक जाणीव आणि न्यायासाठी लढण्याची तयारी स्पष्टपणे दिसून येत आहे. न्यायासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी वकिल संघटनांचा खंबीर पाठींबा आहे असे या कृतीतुन दिसून आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img