मुंबई
बदलापुरमधील (Badlapur) शाळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Badlapur School Rape Case) झाल्यानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन रेलरोको केला. या घटनेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटतं की आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी योजना राबवतोच पण त्याचबरोबर त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण फक्त काही राज्यांनाच टार्गेट करून चालणार नाही तर देशाच्या प्रत्येक भागात आपल्या मुलींचे रक्षण केले पाहिजे आणि आरोपींवर त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात अशा घटना हल्ली वारंवार घडत आहेत. ठराविक राज्यातील ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं, अशी पद्धत आपल्याकडे सुरू झाली आहे. एकाबाजूला आपण ‘लाडकी बहीण’ योजना आणत असताना बहीणींसह राज्यातील छोट्या-छोट्या मुली असुरक्षित आहेत. मुलींवर अत्याचार होत आहेत. मात्र, देशात कुठेही अशी घटना होता कामा नये. अशा घटनेतील गुन्हेगारांवर ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात केस चालवून शिक्षा व्हावी.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो. विधेयकाचा मसुदा तयार होता. त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन कोरोनामुळे दोन ते तीन दिवसांचे झाले होते. आमचे सरकार गद्दारांनी पाडले म्हणून आम्ही हे विधेयक आणू शकलो नाही. आता त्यांनी हे विधेयक रखडवले आहे. हे विधेयक मांडून या आरोपींना या शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे. बदलापूरची शाळा भाजपच्या कोणत्या तरी कार्यकर्त्यांची असल्याचे मला समजले. मात्र, यात राजकारण आणण्याचा माझा हेतू नाही. कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलेच पाहिजे असंही ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, एखाद्या महिलेवर अत्याचार करणारे गुन्हेगार जबाबदार असतात. त्याचप्रमाणे त्या प्रकरणाचा न्यायनिवाडा करून शिक्षेची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजे. तरच अशा घटनांना आळा बसेल. हाथरस, उन्नाव आणि आता बदलापूरमध्ये ही घटना घडली आहे. मात्र, कुठेही घटना घडली, तरी गुन्हेगार सुटता कामा नये. पक्ष, भेद, भाव विसरून एकत्र झालो, तरच देशातील आणि राज्यातील महिला सुरक्षित राहतील. तेव्हाच आपण लाडकी बहीण आहे, असं म्हणू शकतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.