ठाणे
बदलापूर (Badlapur) शहरातील नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर शाळेतील (Badlapur School Rape Case) सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर घटनेनंतर आता या प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी जर गृहमंत्री मनसेचा असता तर, जागेवर एन्काऊण्टर केला असता अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्या गेल्या अनेक दिवसांपासून घटनेचा पाठपुरावा करत होत्या. जे घडले ते खूपच वाईट होते. असा मानसिकतेच्या लोकांचा एन्काऊंटर झाला पाहिजे. गृह खात्याने यांना ठोकले पाहिजे. एन्काऊंटरच होईल अशी भीती आरोपींच्या मनात बसली पाहिजे म्हणजे लहान मुलींच्या अंगावर हात टाकण्याची कुणाची हिम्मत होणार नाही असे जाधव यांनी म्हटले आहे.
आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक केली. तसेच संस्था चालक, शिक्षकांचीही पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या प्रकरणानतंर पीडित मुलीच्या कुटुंबाने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. यानंतर तक्रार नोंदवण्यात आली.