मुंबई
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार (Badlapur School Rape Case) झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील लेडीज चॉयलेटमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे बदलापूरमधील नागरिक संतप्त झाले आहेत. रस्त्यावर उतरत बदलापूरकरांनी आंदोलन केलं आहे. बदलापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तस बदलापूर रेल्वे स्टेशनवर जात नागरिकांनी घोषणाबाजी केली आहे. रेल्वे रूळावर उतरत नागरिकांनी रेल रोकोदेखील केला आहे. या बदलापूर अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
बदलापूर इथल्या नागरिकांचा संताप आणि झालेला गंभीर प्रकार लक्षात घेत सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. राज्याचं गृहखातं अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या तपालासा आता वेग आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून या बाबतचं ट्विट करण्यात आलं आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत, असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.