बदलापुर
बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार (Badlapur School Case) झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास 12 तास उशिर केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहेत. आंदोलकांचा आक्रोश पाहता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गिरीश महाजन यांनी याप्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं.
गिरीश महाजन म्हणाले की, बदलापुरात झालेल्या घटनेबद्दल जेवढा तुमच्या मनात राग आहे. तेवढा आमच्या मनातही आहे. चर्चेतून विषय सुटत असतो. इथे कुणाची लीडरशीप नाहीये. कुणी कुणाचं ऐकत नाही. तरुण आहेत. त्यांचा राग योग्य आहे. पण रेल्वे बंद करणं हा पर्याय नाही. एसआयटी नेमली आहे. फार्स्ट ट्रॅकमध्ये खटला चालवणार आहेत. उज्ज्वल निकम यांना आम्ही हा खटला चालवायला देणार आहोत अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
गिरीश महाजन म्हणाले की, पीआयला निलंबित केलं. मुख्याध्यापकाला निलंबित केलं. कुणाची लीडरशीप नाहीये. एका गावचेही नाही. स्थानिकही नाही. त्यामुळे कुणाशी बोलावं. कुणाला कोण समजावणार हे कठिण झालं आहे. लोक आरोपीला फाशी द्या असं म्हणत आहेत. पण आपल्याकडे तसा कायदा नाही. जे शक्यच नाही अशी मागणी मान्य करता येत नाही. घटना संतापजनक आहे. आमच्या मनातही तेवढाच राग आहे. पण ही शिक्षा कायद्याने द्यावी लागेल. कसाबने एवढी माणसे मारली. पण त्यालाही आपण कायद्यानेच शिक्षा दिली असेही गिरीश महाजन म्हणाले.
गिरीश महाजन म्हणाले की, मुली बऱ्या आहेत. त्यांना कोणताही त्रास नाही. सीसीटीव्ही फुटेज वापरले जात आहे. आमच्या ताब्यात द्या मारून टाकतो, असं म्हणत आहेत. पण कायद्याने तसं करता येत नाही. हेड कॉन्स्टेबल निलंबित केले आहे. लाडकी बहीणचं ट्विट केलं. ते रात्री केलं आहे. या घटनेचा काही लोक राजकीय फायदा घेत आहेत. तो घेऊ नये असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.