“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” (Ladki Bahin) योजना सध्या ही आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला राजकीय लाभासाठी अत्यंत महत्वाची असल्यामुळे रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत प्रचारासाठी भाजप आणि शिंदे गटात सध्या चढाओढ पहायला मिळत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या उपस्तिथित अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून अन्य माध्यमांमधूनही ह्या योजनेचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे.
अंधेरीतील पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून प्रदिप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा इच्छुक असल्यानं भाजपचे मुरजी पटेल हे देखील निवडणुकीची तयारी करत आहेत. पटेल यांनी फडणवीस यांच्या उपस्तिथीत तर शर्मा यांनी शिंदे यांच्या उपस्तिथीत रक्षाबंधनाचे दोन कार्यक्रम आयोजित केले असून, लाडकी बहीण योजनेसाठी अभिनंदन करण्यासाठी फडणवीस यांनी भाजप महिला मोर्चाच्या पुढाकाराने २५ लाख राख्या पुढे पाठवण्यात येत आहेत. शिंदे गट व भाजप गटातील आमदार – खासदार आणि पदाधिकाऱ्यांकडून या योजनेच्या प्रचारासाठी माहिती पुस्तिका,विविध कार्यक्रम व फलक लावण्यात येत आहेत. तसेच काही भागांमध्ये राख्या देखील घरोघरी पाठवण्यात येत आहेत. या योजनेचा प्रचार करून राजकीय लाभ निवडणुकीत उठविण्यासाठी भाजप आणि शिंदे गट प्रयत्नशील आहे.
योजनेची मुदत काढून टाकण्याची मागणी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यासाठी अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याने या योजनेसाठीची अंतिम मुदत काढून टाकण्याची मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना पत्र पाठवून केली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी १५ जुलै पर्यंतची मुदत होती. मुदत वाढवण्याची मागणी केल्यावरती ही मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत करण्यात आली. महिलांना सामाजिक सुरक्षा व हक्क देणारी योजना असल्यामुळे अर्ज करण्याची मुदत काढून टाकावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.