नवी दिल्ली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारवर गंभीर आरोप केला आहे. केंद्र सरकार केंद्रीय लोकसेवा (UPSC) आयोगाऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (RSS) मार्फत मोठ्या पदांसाठी भरती (Recruited) करत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यूपीएससीने नुकत्याच केलेल्या भरतीचा संदर्भ देत राहुल गांदी म्हणाले की, केंद्रीय लोकसेवा आयोगाऐवजी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या माध्यमातून लोकसेवकांची भरती केली जात आहे. असे करून नरेंद्र मोदी संविधानावरच हल्ला करत आहेत. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयातील महत्त्वाच्या पदांवर लॅटरल एन्ट्रीद्वारे भरती करून एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांचे आरक्षण खुलेआम हिसकावले जात आहे.
आपल्या जुन्या गोष्टींची आठवण करून देताना राहुल गांधी म्हणाले, सर्वोच्च नोकरशाहीसह देशातील सर्व उच्च पदांवर वंचितांना प्रतिनिधित्व दिले जात नाही. त्यात सुधारणा करण्याऐवजी त्यांना पार्श्विक प्रवेशाद्वारे उच्च पदांवरून काढून टाकले जात आहे.
यूपीएससीची तयारी करणाऱ्या हुशार तरुणांच्या हक्कांवर हा दरोडा असून, वंचितांसाठी आरक्षणासह सामाजिक न्यायाच्या संकल्पनेलाही मोठा धक्का आहे. काही कॉर्पोरेट्सचे प्रतिनिधी महत्त्वाच्या सरकारी पदांवर विराजमान होऊन काय शोषण करतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सेबी, जिथे खाजगी क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीला प्रथमच अध्यक्षपद दिले गेले, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
सपा आणि बसपानेही यूपीएससीच्या या लॅटरल एंट्री योजनेला विरोध केला आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले की, या योजनेच्या विरोधात 2 ऑक्टोबर रोजी मोठे आंदोलन करणार आहे. कॉर्पोरेट्सचा सरकारी व्यवस्थेवर कब्जा आम्ही खपवून घेणार नाही. कॉर्पोरेट्सचा श्रीमंत भांडवलशाही विचार हा जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा असतो.