मुंबई
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला (Ladki Bahin Yojana) राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे देखील जमा झाले. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचा वातावरण आहे. पण मुंबईमध्ये लाडक्या बहिणींनी आंदोलन केलं आहे. आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको तर हक्काच घर पाहिजे असं साकडं या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना घातले आहे. रक्षाबंधनानिमित्त मुंबईत (Mumbai) लाडक्या बहिणींनी हे अनोख्या पद्धतीचं (Women Protest) आंदोलन केलं आहे.
मुंबई सेंट्रल येथील BIT चाळीमध्ये राहणाऱ्या महिलांनी आंदोलन केले आहे. राखी आणि आरतीच ताट हातात घेऊन लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांकडे साकडं घातलं आहे. रक्षा बंधनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणींनी हक्काच्या घराची मागणी केली आहे. बीडीडी चाळीसंदर्भात सरकारने जसे धोरण ठरवले तसे धोरण ठरवून BIT चाळीचा विकास करण्याची रहिवाश्यांनी मागणी केली आहे.
बीआयटी चाळीतील महिलांच्या आंदोलनाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य करावी असे मत या महिलांनी व्यक्त केले. घर बळकावणाऱ्या विकासकावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात सगळीकडे लाडकी बहीण योजनेचीच चर्चा पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये ३००० हजार रुपये जमा झाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत आधी १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. पण या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सरकारने मुदत दोन महिने ठेवण्याचे ठरवले. आता ३१ ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून १५०० रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे.