राज्यात विधानसभा निवडणुका अगदी जवळ (Maharashtra Elections) आल्या आहेत. अशात आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत असे दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि महायुतीकडून होत आहे. निदान नेते मंडळी तरी तसं भासवत आहेत. पण, कार्यकर्ते काही ऐकायला तयार नाहीत. त्यांचा राग कधीतरी अनावर होतो आणि मग नेत्यांना काळे झेंडे दाखवण्याचे प्रकार घडतात. असाच प्रकार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबतीत घडला आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत मात्र भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवले. तसेच येथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या वाहनांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले.
Ajit Pawar अजित पवारांना दाखवले काळे झेंडे
जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी केला. तसेच अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, याबद्दलही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.यामुळे नारायणगावात अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी मोठी घोषणाबाजीही करण्यात आली. या घटनेनंतर नारायणगावमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले.
‘या’ मतदारसंघासाठी विधानसभेत शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच
Ajit Pawar आशा बुचके यांची प्रतिक्रिया
“अजित पवार ज्या पद्धतीने चोरुन चोरुन बैठक घेतात. प्रचारसभांचा गैरवापर करतात. आमचा तालुका पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटनाच्या तालुक्यात सर्वांना विश्वासात घेऊन काम व्हायला हवं. त्यांना महायुती मान्य नसेल तर अजित पवारांनी तसं स्पष्ट सांगावं. अजित पवारांनी माझा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट घोषित करावे”, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.
“काल आम्हाला समजलं की आज राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे. तहसीलदार, कलेक्टर अशा सर्वांना घेऊन बैठकी केल्या जातात. या बैठकीत नेमकं दडलंय काय? हे आम्हाला समजलं पाहिजे. तो आमचा हक्क आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा फोटो गायब करतात. मग जर तुम्हाला महायुती मान्य नसेल, तर अजित पवारांनी ते स्पष्ट सांगावं”, असेही त्या म्हणाल्या.