सांगली
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) सांगलीच्या (Sangli Vidhansabha) जागेवरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) ठिणगी पडली होती. त्याची पुनरावृत्ती आता विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) होण्याची शक्यता आहे. खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी थेट महायुतीच्या (MahaYuti) उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. पाटील यांची ही भूमिका ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसमध्ये (Congress) पुन्हा वादाचे कारण ठरण्याची शक्यता आहे.
विशाल पाटील यांनी दिल्लीत उद्धव ठाकरेंना विधानसभेसाठी एकत्र राहण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर सांगलीत आल्यानंतर पाटलांनी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात जाहीर भूमिका केल्याने खळबळ उडाली आहे. विशाल पाटलांनी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेना गटाशी पुन्हा भिडणार असल्याचे स्पष्ट केले. सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांच्या पाठिशी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खानापूर विटा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. शिवसेनेकडून तशी मागणी देखील करण्यात आली आहे. असे असतानाही खासदार पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर विटा मतदारसंघात वेगळी भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. आपण अपक्ष असून कोणाला घाबरत नाही. आम्हाला कोणी बोलायचे कारण नाही, अशा भाषेत खासदार विशाल पाटलांनी आघाडी आणि ठाकरे गटाला इशारा दिला आहे.
काँग्रेसचे सहयोगी सदस्य असणारे अपक्ष खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीत उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकत्र लढण्याचा शब्द दिलेला आहे. दुसऱ्या बाजूला विशाल पाटलांनी मतदारसंघात येऊन विरोधात भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि ठाकरे गट विशाल पाटलांच्या बाबतीत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.