10.4 C
New York

Election Commission : दोन राज्यांत वाजला विधानसभा निवडणुकीचे बिगुल, आयोगाकडून घोषणा

Published:

नवी दिल्ली

भारतीय निवडणूक आयोगानं (Election Commission) अखेर जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly elections) शुक्रवारी जाहीर केल्या. त्यानुसार, या दोन्ही राज्यांमध्ये १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर ६ ऑक्टोबरला निकाल असणार आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. सन २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर आणि जम्मू -काश्मीर हे राज्य केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीची घोषणा केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये 2014 मध्ये अखेरची निवडणूक झाली होती. 2018 मध्ये सरकार कोसळल्यानंंतर मागील सहा वर्षांपासून राज्यपाल राज्याचे कामकाज पाहत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली जात होती.

लोकसभेत 58 टक्क्यांहून अधिक मतदान जम्मू आणि काश्मीरमध्ये झाले होते. त्यामुळे 370 कलम हटवल्यानंतर मतदारांमधील उत्साह वाढल्याचे निरीक्षण केंद्रीय आयोगाकडून नोंदवण्यात आले होते. 2019 च्या तुलनेत मतदानात मोठी वाढ झाली. एकाही मतदान केंद्रावर हिंसाचाराची गंभीर घटना घडली नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 11 हजार 838 मतदान केंद्र असतील. त्यामध्ये शहरी भागात 9 हजार 506 तर ग्रामीण भागात 2 हजार 332 मतदान केंद्रांवर मतदान होईल. लोकसभेप्रमाणेच या निवडणुकीतही मतदारांमध्ये उत्साह असेल, असा विश्वास राजीव कुमार यांनी व्यक्त केला.

हरियाणामध्ये 2.01 कोटी मतदार आहेत. एकूण 20 हजार 629 मतदान केंद्र असणार आहेत. गुडगाव, फरिदाबाद आणि सोनिपत या भागात उंच इमारतींमध्ये तसेच झोपडपट्टी भागात मतदान केंद्र असतील. जम्मू आणि काश्मीरमध्ये 20 ऑगस्ट तर हरियाणामध्ये 27 ऑगस्ट रोजी अंतिम मतदारयाद्या प्रसिध्द केल्या जाणार आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यांपैकी 74 सर्वसाधारण, SC-7 आणि ST-9 आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 87.09 लाख मतदार आहेत. ज्यामध्ये 44.46 लाख पुरुष, 42.62 लाख महिला, 3.71 लाख प्रथमच मतदार आणि 20.7 लाख तरुण मतदार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img