दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना (Arvind Kejriwal) सुप्रीम कोर्टाने जोरदार धक्का दिला आहे. न्यायालयाने (Supreme Court) केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीत केजरीवालांना अंतरिम जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना जामीन द्यावा अशी विनंती अभिषेक मनू सिंघवी यांनी केली होती. यावर न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की आम्ही अंतरिम जामीन देऊ शकत नाही.
दिल्ली दारू घोटाळ्यात (Delhi Liquor Case) सीबीआयच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या खटल्यात जामीन मिळण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात धाव घेतली होती. जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्ज्वल भूयान यांच्या पीठाने सीबीआयला नोटीस बजावली. या प्रकरणावर पुढील सुनावणी 23 ऑगस्टला होईल असे न्यायालयाने स्पष्ट केले. दारू घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी तब्बल 17 महिन्यांनंतर जामीन मिळाला.
काँग्रेसबाबत हिंडेनबर्गचा नवीन खुलासा
सुनावणी दरम्यान अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, मनी लाँड्रिंग केसमध्ये केजरीवाल यांना तीन वेळेस जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयातून 10 मे आणि 12 जुलै रोजी त्यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. ट्रायल कोर्टाच्या आदेशावर दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती आणली. सीबीआयच्या केसमध्ये कोणत्याही कठोर अटी नाहीत मग जामीन का मिळू शकत नाही असा युक्तिवाद त्यांनी केला.
ईडीच्या खटल्यात सीबीआयने आधी अरविंद केजरीवालांना अटक केली. यामुळे ते अजूनही तुरुंगात आहेत. आता त्यांना फक्त अंतरिम जामीन मिळावी अशी मागणी आहे, असे सिंघवी म्हणाले. यावर न्या. सूर्यकांत यांनी सांगितले की आम्ही कोणत्याही प्रकारचा अंतरिम जामीन देत नाही. यावर सिंघवी यांनी केजरीवालांच्या आरोग्याचा हवाला दिला. त्यांना सध्या आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर सुनावणी घ्यावी. यानंतर सुप्रीम कोर्टाने येत्या 23 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल असे स्पष्ट केले.