नवी दिल्ली
रामदेव बाबा (Ramdev Baba) यांना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. जाहिरातीमधून लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी दाखल असलेला अवमान खटला सुप्रीम कोर्टाने रद्द केला. पतंजली (Patanjali) उद्योग समूहाच्या जाहिरातीमधून अवमान झाल्याची याचिका दाखल करण्यात आली होती. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे.
पतंजलीच्या उत्पादनांबद्दल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दिल्याप्रकरणी माफीनामा दाखल करण्यात आला होता, जो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय दिला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजलीवर कोविड-19 लसीकरणासंदर्भात मोहीम चालवल्याचा आरोप केला होता. त्यावर न्यायालयाने पतंजली आयुर्वेदच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ थांबवाव्यात, असा इशारा दिला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेत पतंजलीच्या भ्रामक जाहिरातीमुळे ॲलोपॅथी औषधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले होते.
IMA ने म्हटले होते की पतंजलीचे दावे पडताळले गेले नाहीत आणि ते ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019 सारख्या कायद्यांचे थेट उल्लंघन आहे. पतंजली आयुर्वेदाने दावा केला होता की, कोरोना आजार त्यांच्या कोरोनिल औषधाने बरा केला जाऊ शकतो. या दाव्यानंतर आयुष मंत्रालयाने कंपनीला फटकारले आणि तिचे प्रमोशन थांबवण्यास सांगितले होते.