जव्हार
जव्हार शहर (Jawhar) तथा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेवून आपले भवितव्य घडवावे अशी अपेक्षा ठेवत मर्चंट नागरी पतसंस्था (Merchant Pathsanstha) जव्हारचे संस्थापक तथा विद्यमान चेअरमन संदीप वैद्य आणि त्यांचे सहकारी संचालक यांच्या सुपीक संकल्पनेतून सोमवारी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन श्रीराम मंदिर येथील श्रीराम तीर्थ सभागृह येथे करण्यात आले होते. या शिबिरात बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शिवाय पालकांचीही शेकडोच्या संख्येत उपस्थिती होती.
शिक्षणानंतरचे असंख्य मार्ग उपलब्ध असताना पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये भविष्यातील कोणते पर्याय निवडावे याबद्दल झालेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी “अभ्यासातून करिअर” कडे या मार्गदर्शन शिबिरात करिअर निर्णय कॅलेंडरचे लेखक, प्रेरणादायी व्याख्याते , करिअर समुपदेशक, करिअर पाथ निर्मितीमध्ये विश्वविक्रम करणारे करिअर तज्ञ प्रा. विजय नवले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाच्या नाना संधी कशा उपलब्ध होऊ शकतात याबाबत सविस्तर संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक प्रसंग आणि संदर्भ देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.
जव्हार सारख्या ग्रामीण आणि आदिवासी भागात पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वोच्च परीक्षा यूपीएससीत यश संपादन करत एक वेगळा आदर्श निर्माण करणारे डॉ.अजय डोके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांची अभ्यास पद्धती सांगत प्रोत्साहित केले, तद्नंतर आय आय एम परीक्षा उच्चश्रेनीत प्रावीण्य मिळवणाऱ्या साक्षी कारखानीस यांनी त्यांचे बालपणापासूनचे धडे आणि सध्याच्या स्पर्धेच्या युगात करावा लागणारा अभ्यास किती महत्त्वाचा आहे याबाबत महत्व विशद केले. शिवाय उपस्थित विद्यार्थी व पालकांनी तीनही प्रमुख मार्गदर्शकांना विविध शाखा, रोजगाराची संधी बाबत प्रश्न विचारत मार्गदर्शन घेतले.
जव्हार सारख्या ग्रामीण आणि आदिवासी भागात विद्यार्थी भावी आयुष्यात घडला पाहिजे, असा मानस ठेवून या उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे जव्हार व मोखाडा तालुका येथील पालकांनी, विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.कल्याणी मुकणे यांनी केले.