बांग्लादेशातील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. (Bangladesh violence) देशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावरील हल्ल्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. काल बांग्लादेशच्या सरन्यायाधीशांना राजीनामा देण्यास आंदोलकांनी भाग पाडले. त्यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. बांग्लादेश सैन्याच्या वाहनावर हल्ला झाला आहे. गोपालगंज भागात ही घटना घडली आहे. ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यात सैन्याचे जवान, पत्रकार आणि स्थानिक लोकांसह 15 जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोघा जणांनी गोळी लागली आहे. अवामी लीग पक्षाचे हजारो कार्यकर्ते शेख हसीना यांच्या बांग्लादेश वापसीची मागणी करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अवामी लीग पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक शेख हसीना यांच्या देश वापसीची मागणी करत होते. या जमावाने ढाका-खुलना महामार्ग बंद केला होता. याच दरम्यान सैन्याचं वाहन येथे आले. त्यांनी आंदोलकांना आंदोलन थांबवून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या. परंतु, लोकांनी उलट सैन्यावरच विटा फेकण्यास सुरुवात केली. परिस्थिती चिधळत असल्याचे लक्षात येताच सैन्यातील जवानांनी गर्दीला पांगवण्यासाठी लाठीमार केला.
बांग्लादेशात पुन्हा गोंधळ, सरन्यायाधीशांचा राजीनामा
यामुळे संतापलेल्या जमावाने लष्कराच्या वाहनांची तोडफोड करत आग लावली. गोपालगंज कॅम्पचे लेफ्टनंट कर्नल मकसुदूर रहमान यांनी या घटनेला दुजोरा दिला. जवळपास तीन ते चार हजार लोकांनी रस्ता बंद केला होता असे त्यांनी सांगितले. या हल्ल्यात काही जवानही जखमी झाले आहेत. गोपीनापूर संघाचे माजी अध्यक्ष लच्छू शरीफ म्हणाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैनिकांनी गोळीबारही केला. एक लहान मुलासह दोन लोकांवर गोळ्या झाडल्या. यात ते जखमी झाले आहेत मात्र कुणाच्या मृत्यूची माहिती अजून मिळालेली नाही.
बांग्लादेशातील सध्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. हिंसेपासून संरक्षण मिळावे म्हणून हजारो बांग्लादेशी नागरिक भारत-बांग्लादेश बॉर्डरवर येऊन थांबले आहेत. भारतात येऊ देण्याची विनंती करत आहेत. मात्र सीमा सुरक्षा दलाने या लोकांना तिथेच रोखले आहे. पोलीस महानिदेशक जीपी सिंह यांनी सांगितले की बेकायदेशीर मार्गाने एकही बांग्लादेशी नागरिक भारतात येऊ नये याची खबरदारी घ्या अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.