२०१९ विधानसभा निवडणूकीचा निकाल त्रिशंकू लागला. पवारांनी यात संधी शोधली. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) युती तोडायला लावली. शिवसेना (अविभक्त), राष्ट्रवादी (अविभक्त) आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन झालं. ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पवारांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्या पवारांनी ठाकरेंचा राज्याभिषेक केला. त्यांनाच डावलून ठाकरे पुढे जातायेत का? असा प्रश्न उभा राहतोय. याला कारण ठरतायेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात घडून गेलेल्या काही घडामोडी. विधानपरिषद निवडणूकीत पवार आणि ठाकरेंमधील दुरावा असो की दिल्ली दौरा करत पवारांना डावलण्याचा ठाकरेंचा प्रयत्न. राज्याचं राजकारण वेगळं वळण घेतंय. हे चित्र स्पष्ट होतंय.
कॉंग्रेस अध्यक्ष मलिकार्जून खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि महासचिव सी. व्ही वेणूगोपालराव यांची दिल्लीत ठाकरेंनी भेट घेतली. या भेटीचे तपशील अधिकृतरित्या समोर आलेले नाही. मात्र, सुत्रांनी दिलेली माहिती ठाकरे प्रेमींना अस्वस्थ करणारी आहे. ठाकरेंचा हा दिल्ली दौरा मुख्यमंत्री पदाच्या मागणीसाठी होता. राज्यात तीन महिन्यात विधानसभा निवडणूका पार पडणारेत. काँग्रेसकडून ठाकरेंना सत्ता आल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील यासाठी ग्रीन सिग्नल हवा आहे. यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत, आणि आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांची भेट घेतली. या दौऱ्याने अनेक गोष्टी सिद्ध केल्यात. २०१९ ला शरद पवारांना जे महत्त्व होतं ते राहुल गांधींना प्राप्त झालंय. शेवटचा शब्द हा मागच्या सरकारमध्ये शरद पवारांचा होता. आता तो कॉंग्रेसचा असणार आहे.
सहकारी साखर कारखान्यांवर अमित शाहंचं अजब वक्तव्य
ठाकरेंच्या नजरेत पवारांचं महत्त्व कमी झालंय का? असा प्रश्न उपस्थित होतो. संजय राऊतांनी गेली पाच वर्षे पवारांची बाजू लावून धरली होती. पवारांचे प्रवक्ते अशी टीका भाजप नेत्यांकडून संजय राऊतांवर होत होती. आता मात्र कॉंग्रेस नेत्यांच्या मर्जीला सांभाळण्यावर भर दिला जातोय. अशी टीका होतीये. टीकेचे हे बदलले सुर विधानपरिषद निवडणूक निकालानंतरचे आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत शरद पवारांनी शिवसेनेला विश्वासात घेतलं नाही. परस्पर शेकापच्या जयंत पाटील यांना उभं केलं. अशी चर्चा होती. उद्धव ठाकरेंनीही यावर प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या जवळच्या माणसाला, मिलिंद नार्वेकरांना, निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला २०१९ मध्ये उद्धव ठाकरे तयार होते, पण शरद पवारांनी वेगळं मत माडलं. उद्धव ठाकरेंना स्वतः मुख्यमंत्री होण्याची गळ घातली. त्यातून शिवसेनेची राजकीय स्थिती बिघडली. ज्या पवारांनी मुख्यमंत्री पद दिलं त्यांना डच्चु देण्याचं काम ठाकरे करतायेत का? असा प्रश्न विधानपरिषद निवडणूकीचा निकाल आणि ठाकरेंचा दिल्ली दौरा उपस्थित करतोय
महायुतीचं सरकार बनल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेंना मिंदे म्हणणे. त्यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री ठरवणे. यावर आदित्य आणि उद्धव ठाकरे या पितापुत्रांनी भर दिला होता. पण पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोकाचा विरोध केला नाही. उलट एकमेकांच्या आधूनमधून भेटी घेतल्या. बारामतीत दादांची खास माणसं शिंदेंनी फोडल्याचा आरोप होतो. दादा गटाला शिंदे गटानं मदत केली नाही. असे आरोप झाले. महायुतीतली धुसफूस बाहेर आली. मराठा आंदोलनाचा पवार आणि शिंदे या दोघांना समसमान फायदा झाला. याला फक्त योगायोग म्हणता येणार नाही. कॉंग्रेससोबत राहुन पवारांनी कॉंग्रेस कमजोर केली. असा आरोप आजही होतो. ठाकरेंना हे भविष्यात नको आहे. त्यामुळं पवारांना ओलांडून ठाकरे थेट कॉंग्रेसची वाटाघाटी करत आहेत. महाविकास आघाडीतल्या दरीची ही निशाणी आहे.