नाशिक
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) आनंदाची बातमी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त मंत्री मुंडे नाशिकमध्ये आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली. मागील वर्षी खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PM Pik Vima Yojana) सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम 31 ऑगस्टच्या आत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
पीक विमा योजना आणि जिल्ह्यातील शेती संबंधांतील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीस पीकविमा कंपनीचे अधिकारी, राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगा आधारे आणि उत्पन्नात आलेली घट या निकषांवर देय असलेली 853 कोटी रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे बाकी असल्याची माहिती मंत्री मुंडे यांना देण्यात आली. यानंतर मुंडे यांनी तत्काळ विमा कंपनीचे राज्य प्रमुखांशी संपर्क साधला आणि कंपनीकडे बाकी असलेली रक्कम तत्काळ देऊन टाका अशा सूचना दिल्या. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येत्या 31 ऑगस्टच्या आत पैसे देण्याचे मान्य केले. आता ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
मागील वर्षातील खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यातील 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरवला होता. 21 दिवस पावसात खंड पडल्याने शेतकऱ्यांना 79 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी कंपनीकडून मिळाले होते. तसेच स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसानीपोटी 25 कोटी 89 लाख रुपये मंजूर झाले होते. या रकमेचंही वाटप सुरू झालं आहे. त्यानंतर आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे विमा कंपनीकडे असलेले पैसेही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.