[ ओतूर पोलीसांची कारवाई ]
ओतूर,प्रतिनिधी:दि.७ ऑगस्ट ( रमेश तांबे )
हातात धारदार तलवारी घेवून, समाजामध्ये दहशत माजवणाऱ्या तिघांच्या ओतूर (Otur) पोलीसांनी मुस्क्या आवळल्या असून, त्यांची थेट रवानगी येरवडा कारागृहात केली असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी दिली. सुरज भरत पवार वय २६ वर्षे,दत्तात्रय जगन्नाथ जाधव वय २७ वर्षे, प्रदिप दिलीप काळे वय ३६ वर्षे, तीघेही रा.ओतूर, ता.जुन्नर,जि. पुणे अशी आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची थेट रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल ज्योतीराम तानाजी पवार यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना श्री थाटे म्हणाले की, बुधवार दि.३१ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास,ओतूर गावातील स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रोडवर सुरज पवार,दत्तात्रय जाधव,प्रदिप काळे हे तिघे दोन धारदार तलवारी एकमेकांच्या हातात घेवून समाजामध्ये दहशत माजविण्याच्या उद्देशाने, तसेच लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल,अशा रितीने फिरत असल्याची गोपनिय माहीती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांना मिळाली.
त्यानुसार ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,पोलीस हवालदार,दिनेश साबळे,महेश पटारे,विलास कोंढावळे,भारती भवारी, पोलीस कॉन्स्टेबल ज्योतीराम पवार, रोहीत बोंबले,मनोजकुमार राठोड, किशोर बर्डे,संतोष भोसले,संदिप भोते, अतुल भेके यांना शुक्रवार दि.२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सदर आरोपींकडे पुन्हा दोन तलवारी जवळ बाळगल्या असल्याच्या स्थितीत मिळून आल्याने त्यांना पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीसांनी केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनेश साबळे हे करत आहे.